पाकिस्तानातही गणेशोत्सवाचा जल्लोष

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 6 d ago
पाकिस्तानातील गणेशोत्सव
पाकिस्तानातील गणेशोत्सव

 

पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या पाचशेहून अधिक मराठी नागरिकांनी दीड दिवसाचा गणेशोत्सव थाटात साजरा केला. महंमद अली जीना मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीनंतर श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी भक्तिभावाची साद घालत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

फाळणीपूर्वी पाकिस्तान भारताचाच भाग होता आणि कराची हे मुंबई इलाक्यात येत होते. कराचीत त्यावेळी हजारो मराठी कुटुंबे वास्तव्यास होती. फाळणीनंतर त्यातील बहुतेक कुटुंबे भारतात आली; पण शेकडो कुटुंबे पाकिस्तानात, खास करून करचीतच राहिली. त्यात कृष्णा नाईक यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.

कृष्णा नाईक हे मूळचे कोकणातील. त्यांनी तेथे गणेशोत्सवास प्रारंभ केला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र सुनील नाईक व राजेश नाईक यांनी गणेशोत्सवाची परंपरा पुढे कायम ठेवली.

कराचीतील पंजाब कॉलनी, सदर आणि डोली खाता भागात मराठी नागरिक राहतात. कृष्णा नाईक यांचा मुलगा राजेश नाईक समाजासाठी गणपती तयार करतात.

पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांनी गणेशोत्सवादरम्यान भेट दिली होती. सध्याच्या गणेशोत्सवात मुस्लिम कुटुंबे उत्सवात सहभागी होऊन खूप मदत करतात.