ढाका : बांगलादेशमधील हंगामी सरकारला भारताने पाठिंबा दिल्यास आणि या देशातील एकाच व्यक्ती व पक्षावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर पक्षांशीही संबंध दृढ केल्यास भारतालाच फायदा होईल, असे मत राजकीय विश्र्लेषकांनी व्यक्त केले आहे. बांगलादेशमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अद्यापही पूर्वपदावर आलेली नसून नोबेल विजेते महंमद युनूस हे हंगामी सरकारचे नेतृत्व करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केलेल्या शेख हसीना सध्या भारतात आहेत. भारताने केवळ त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षाकडे लक्ष देण्याऐवजी बांगलादेशातील इतर पक्षांशीही संबंध प्रस्थापित करावेत, अशी अपेक्षा या देशातील राजकीय विश्र्लेषकांनी आणि विचारवंतांनी व्यक्त केली आहे. असे करण्यात भारताचाही फायदाच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
‘‘संबंध पूर्ववत करण्यासाठी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. भारत आणि बांगलादेश हे दोन्ही स्वतंत्र व समंजस देश असल्याने हे शक्य आहे,’’ असे मत बांगलादेश एंटरप्राइज इन्स्टिट्यूटचे प्रमुख हुमायून कबीर यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले.
‘‘भारत आमचा शेजारी देश आहे आणि आमच्या प्रत्येक अडचणीत त्यांनी आम्हाला मदत केली आहे. सध्याच्या परिस्थितीतही भारताने आम्हाला मदत केल्यास येथील जनतेमध्ये सच्चा मित्र म्हणून भारताची प्रतिमा दृढ होईल,’’ असेही कबीर म्हणाले.
निवृत्त मेजर जनरल मुनीर उझ झमान म्हणाले,"बांगलादेशात जनतेने घडवून आणलेल्या क्रांतीची भारताने दखल घ्यावी. आतापर्यंत त्यांनी केवळ एकाच व्यक्तीला आणि पक्षाला मदत केली आहे. भारताने आता बांगलादेशच्या हिताकडेही लक्ष द्यावे."
अर्थतज्ज्ञ, देवप्रिया भट्टाचार्य यांनी सांगितले कि, "शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी भारत-बांगलादेश मैत्री कायम टिकणे अत्यावश्यक आहे. भारतात काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशी जनतेने भाजपची जुळवून घेतले होते. आता आमच्याकडे अवामी लीगची सत्ता गेली आहे. भारतानेही नव्या सरकारला मदत करावी."