पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांना १४ वर्ष तर त्यांची पत्नी बुशरा बिबी यांना ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात १९० दशलक्ष पौंडच्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या भ्रष्टाचारात दोषी आढळल्यानंतर शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश नसीर जावेद राणा यांनी या प्रकरणातील निकाल दिला.
इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून रावळपिंडी येथील तुरूंगात आहेत. दरम्यान आर्थिक गैरव्यवहाराच्या बाबतीत या खटल्यातील आलेला निकाल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निकाल आहे. त्यांना भ्रष्टाचार व आणि अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल तर पत्नीला बेकायदा कृत्यांमध्ये सामील असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. संसदेत विश्वासदर्शक ठराव गमावल्याने २०२२मध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या इम्रान यांच्यावर अनेक खटले सुरू आहेत.
४ प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले
इम्रान खान यांच्यावरचा हा चौथा मोठा खटला होता. याआधी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोशाखाना प्रकरणात (सरकारी भेटवस्तू विकणे), सायफर प्रकरण (अमेरिकन राजदूताने पाठवलेली माहिती लीक करणे), इद्दत प्रकरण (बेकायदेशीरपणे विवाह) प्रकरणात इम्रान खानला दोषी ठरवण्यात आले होते. याशिवाय इम्रान खानवर इतर डझनभर खटले सुरू आहेत. ही सर्व प्रकरणे राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे खान यांचे म्हणणे आहे. आता अल कादिर ट्रस्ट प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय आहे अल-कादिर ट्रस्ट प्रकरण
इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर बहरिया टाऊन लिमिटेडद्वारे अब्जो रुपये आणि शेकडो कनाल जमीन मिळवली असा आरोप होता. यूनायटेड किंगडमद्वारे पाकिस्तानला ५० अब्ज रुपये वैध करण्यासाठी परत करण्यात आले होते. तो हा सर्व पैसा होता. डिसेंबर २०२३मध्ये इस्लामबादच्या न्यायालयाने या प्रकरणात निकाल देण्यासाठी ६ जानेवारीची तारीख निश्चित केलेली. न्यायाधीशांची अनुपस्थिती आणि अन्य कारणांमुळे निकालाला विलंब झाला. त्यानंतर काल (दि.१७) या प्रकरणाचा निकाल लागला.
नॅशनल अकाऊंटबिलिटी ब्यूरो NAB ने डिसेंबर २०२३ मध्ये इमरान आणि अन्य सात आरोपींविरोधात भ्रष्टाचाराच प्रकरण नोंदवले होते. यात आरोप करण्यात आला होता की, इम्रानने बेकायदरित्या राज्याचा पैसा बहरिया टाऊनच्या खात्यात स्थानांतरीत केला. अन्य आरोपींमध्ये प्रॉपर्टी टायकून मलिक रियाज हुसैन त्यांचा मुलगा आणि पीटीआय सरकारमधील पूर्व अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणात महत्त्वपूर्ण साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष दिलीच परंतु इम्रान खान यांचे माजी प्रधान सचिव आजम खान यांनी देखील साक्ष दिली आहे.