गाझात शस्त्रसंधी लागू करा - संयुक्त राष्ट्रे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
इस्राईलच्या हवाई हल्ल्यात नष्ट झालेल्या घरे
इस्राईलच्या हवाई हल्ल्यात नष्ट झालेल्या घरे

 

इस्त्राईल आणि हमास यांच्या संघर्षात गाझातील जनता होरपळून निघत असताना संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दोन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. गाझा पट्टीत तात्काळ शस्त्रसंधी लागू करणे, हमास आणि अन्य गटांच्या ताब्यात असलेल्या ओलिसांची तत्काळ सुटका करणे असा मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. 

पॅलेस्टाईनच्या निर्वासित नागरिकांसाठी मदतकार्य करणाऱ्या 'यूएनआरडब्लूए संघटनेला पाठिंबा देणारा ठरावही संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेत मंजूर करण्यात आला. या संघटनेला काम करण्याबाबत इस्त्राईलने आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत गाझात शस्त्रसंधीची मागणी करणारा प्रस्ताव अमेरिकेच्या नकाराधिकारामुळे फेटाळला गेला. त्यामुळे या प्रस्तावासाठी संयुक्त राष्ट्राचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. 

संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार, आमसमेत एखादा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज भासते. सध्या आमसभेच्या सदस्य देशांची संख्या १९३ आहे. इस्त्राईलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टाईन क्षेत्रातील गाझात कोणत्याही अटीविना कायमस्वरूपी शस्त्रसंधीची मागणी करणाऱ्या ठरावाच्या बाजूने १५८ मते पडली, तर त्याच्या विरोधात नऊ देशांनी मतदान केले. तेरा देशांनी यात सहभाग घेतला नाही. या ठरावात सर्वांना शस्त्रसंधीचा आदर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. ओलिसांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी केली आहे.

 'यूएनआरडब्लूए' साठी घेण्यात आलेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने १५९ तर विरोधात ९ देशांनी मतदान केले. अकरा देश गैरहजर राहिले, या ठरावात पॅलेस्टिनी नागरिकांची होणारी उपासमार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हटले आहे. शिवाय गाझात संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली प्रवेश सुलभ करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. काल या ठरावावरील मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर दोन दिवस भाषणे झाली आणि त्यात इस्राईल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यात चौदा महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपविण्याचे आवाहन करण्यात आले.

इस्त्राईल आणि त्याचा जवळचा देश अमेरिका यांनी या ठरावाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सुरक्षा समितीतील ठराव हे कायदेशीरपणे बंधनकारक असून आमसभेत ठराव आणले जात नाहीत. मात्र या ठरावाच्या मदतीने जगाचा कल समजून घेण्यात मदत मिळते. आमसभेत नकाराधिकाराचा वापर होत नाही. 

इस्त्राईलचा संघटनेवर आरोप 
इस्त्राईलच्या आरोपानुसार, गाझात यूएनआरडब्लूए संघटनेत तेरा हजाराहून अधिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे डझनभर कर्मचाऱ्यांनी इस्त्राईलवर हल्ला करण्याच्या कारवाईत भाग घेतला आणि त्यामुळे युद्ध पेटले. यानुसार इस्त्राईलने यूएनआरडब्लूमधील शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांची नावे संयुक्त राष्ट्राकडे सादर केली आणि त्यांचा हमास संघटनेशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे इस्त्राईलने २८ ऑक्टोबर रोजी संसदेत ठराव आणून या संघटनेला इस्राईलच्या ताब्यातील गाझात काम करण्याची परवानगी नाकारली. परंतु संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅन्टानिओ गुंटरेस यांनी 'यूएनआरडब्लूए' चे गाझातील कार्य मानवी हेतूने पार पाडले जात असल्याचे म्हटले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter