डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर भारताला फायदा होईल की तोटा, यावर चर्चा रंगली असतानाच अध्यक्षपदावर त्यांची निवड होणे हे भारतासह इतर काही आशियाई देशांना फायदेशीर ठरण्याचा अंदाज 'मूडीज्' या वित्तसंस्थेने वर्तविला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या वादामुळे भारताला महत्त्व येण्याचा अंदाज असून गुंतवणूकही वाढू शकते, असे 'मूडीज्'च्या अहवालात म्हटले आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यात अनेक वर्षांपासून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. चीनच्या अनेक धोरणांना अमेरिकेचा विरोध आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या कार्यकाळातही हा विरोध कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच, व्यापारयुद्ध तीव्र झाले असल्याने अमेरिकेकडून चीनवर काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये निर्बंध लागू केले जाण्याचाही अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर चीनमध्ये होणारी गुंतवणूक आशियातील अन्य देशांकडे वळविली जाण्याची शक्यता 'मूडीज्'ने व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या धोरणांमुळे चीनला आर्थिक फटका बसणार असला तरी त्यामुळे भारत आणि इतर काही देशांना फायदा होऊ शकतो, असेही 'मूडीज्'ने म्हटले आहे.
'मूडीज्'च्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यास ते केवळ अमेरिकेच्याच हिताला प्राधान्य देण्याचे धोरण राबवू शकतात. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी काही प्रमाणात विस्कळित होऊन जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञानात शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत नोकरीची संधी मिळावी, असे लाखो भारतीय विद्यार्थी, नोकरदारांचे स्वप्नं असते. परंतु, आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत आल्यानंतर भारतीय नोकरदारांना अमेरिकेत नोकरी करण्याची संधी मिळेल का?, याबाबत विविध स्तरावर चर्चा रंगत आहेत. परंतु, भारत - अमेरिकेतील संबंध अधिक दृढ होऊन अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्नं पाहणाऱ्यांना सुगीचे दिवस येण्याची तसेच भारतातील अमेरिकेची गुंतवणूक वाढण्यास चालना मिळण्याची शक्यता वृद्धिंगत होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बी.ई आणि बी.टेक पदवी घेतलेले पदवीधर तसेच विविध माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदार हे अमेरिकेत नोकरीच्या संधीच्या प्रतीक्षेत असतात. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर अमेरिकेत नोकरीच्या संधी पाहणाऱ्या भारतीयांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकतर, ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ या धोरणामुळे भारतीयांना अमेरिकेत रोजगार आणि अमेरिकेकडून सॉफ्टवेअर निर्मितीसाठी भारतातील कंपन्यांना मिळणाऱ्या संधी यापुढेही मिळतील का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, भारत-अमेरिकेतील राजकीय संबंध चांगले असल्यामुळे भविष्यात या संधी वाढण्यास चालना मिळेल, असे अभ्यासकांनी सांगितले.
‘एच-वनबी व्हिसा’मध्ये भारतीयांचा वाटा सर्वाधिक
अमेरिकेत नोकरी करणाऱ्यांना ‘एच-वनबी’ व्हिसा दिला जातो. ‘यूएस सिटीझनशिप ॲण्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ने (युएससीआयएस) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेने २०२३ या आर्थिक वर्षात ‘एच-वनबी व्हिसा’ दिलेल्या नागरिकांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या ७२.३ टक्के इतकी आहे. अमेरिकेत भारतीयांना नोकरीची सर्वाधिक संधी दिली जात असून या संधीत आणखी वाढ होईल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी)अलाहाबादचे संचालक डॉ. मुकुल सुतावणे हे म्हणतात, "भारत आणि अमेरिकेचे राजकीय संबंध हे चांगले आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम अमेरिकेत नोकरीसाठी असलेले आणि जाण्यास इच्छुक असणाऱ्या भारतीयांवर होणार आहे. ‘अमेरिका प्रथम’ ही धारणा असली, तरीही धोरणात्मक निर्णय घेताना ट्रम्प हे भारतीयांबाबत मैत्रीपूर्ण निर्णय घेतील. त्यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला सुगीचे दिवस येण्याची चिन्हे आहेत. याबरोबरच उत्पादन, सेमी कंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रातही अमेरिकेची भारतातील गुंतवणूक वाढण्यास चालना मिळेल, अशी आशा आहे."
सॉफ्टवेअर एक्स्पोर्टस् असोसिएशन ऑफ पुणे चे सचिव विद्याधर पुरंदरे म्हणतात, "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली असली तरीही त्यांच्या आगामी धोरणांबद्दल आताच अंदाज बांधणे कठीण आहे. परंतु, तरीही भारत-अमेरिका यांच्यातील राजकीय संबंध पाहता अमेरिकेला कायमच भारताचा पाठिंबा अपेक्षित आहे. पुढील काळात धोरणात्मक पावले उचलताना भारत आणि अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांबाबत ट्रम्प यांची भूमिका ही सहकार्याचीच असेल. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही त्याचे सकारात्मक प्रतिबिंब उमटेल, असे वाटत आहे. अमेरिकेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या अधिकाधिक भारतीयांना व्हिसा मिळेल आणि व्यवसायातील गुंतवणूक देखील वाढेल, अशी अपेक्षा आहे."