अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. त्यात त्यंनी सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमती कमी कराव्यात, जगातील सर्व देशांनी व्याजाचे दर कमी करावेत, अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, "मी ग्रीन न्यू डील संपुष्टात आणली आहे. त्याला मी ग्रीन न्यू स्कॅम म्हणेन. मी एकतर्फी पॅरिस जलवायु समझोत्यातून माघार घेतली आहे. महागड्या इलेक्ट्रीक गाड्यांच्या सक्तीला संपविले आहे. अमेरिकेकडे पृथ्वीवरील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कच्चे तेल आहे. मी त्याचा वापर करणार आहे. मी सौदीला आणि ओपेक देशांना कच्च्या तेलाचे दर कमी करावेत असे सांगत आहे. तुम्हाला ते कमी करावे लागतील. सौदीने कच्च्या तेलाचे दर कमी केले तर रशिया आणि युक्रेन युद्धही संपेल."
डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या घोषणेनंतर केले आहे. सौदी अमेरिकेत ६०० बिलिअन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. सलमान यांनी ट्रम्प यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली होती.
याचबरोबर ट्रम्प यांनी उद्योजकांना इशारा दिला आहे. यावेळी ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेत उत्पादने विकायची असतील तर ती अमेरिकेतच निर्माण करा, नाहीतर टेरिफला तयार रहा. आम्ही तुम्हाला जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात कमी कर देऊ. कंपन्यांना त्यांची उत्पादने कुठे बनवायची हे निवडण्याचे स्वातंत्र्य असले तरी, अमेरिकेतील उत्पादन बंद केल्याने आर्थिक परिणाम होतील, जादाचा कर द्यावा लागेल."