रशिया-युक्रेन युद्धात जीव गमावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त करीत हे युद्ध थांबविण्याकडे माझ्या प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करेल, अशी ग्वाही अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दिले. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी माझे प्रशासन काम करेल, असे ते म्हणाले.
‘मार-ए-लागो’ येथे आयोजित केलेल्या ‘अमेरिका फर्स्ट पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘‘आम्ही पश्चिम आशिया आणि रशिया- युक्रेनवर गंभीरपणे पाहत आहोत. हे थांबवायला हवे.
अमेरिकेत पाच नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी केलेले हे पहिले प्रमुख भाषण आणि सार्वजनिक होते. ते म्हणाले, ‘‘ रशिया आणि युक्रेनला थांबवायला हवे. गेल्या तीन दिवसांत हजारो जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आज मी वाचले. ते सैनिक असोत किंवा सामान्य नागरिक आम्ही त्यांच्यासाठी काम करू.’’
‘मार-ए-लागो’ येथील कार्यक्रमाला ट्रम्प यांचे काही वरिष्ठ सल्लागारही उपस्थित होते. कार्यक्षम प्रशासन विभागाच्या (डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी -डीओजीई) प्रमुखपदी नेमलेले ‘टेस्ला’चे मालक एलॉन मस्क आणि भारतीय अमेरिकी उद्योजक विवेक रामस्वामी यांची ट्रम्प यांनी प्रसंशा केली.
युद्ध थांबविताना धडा मिळावा
ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात उप सहाय्यक म्हणून काम केलेल्या आणि २०१७ ते २०२१ पर्यंत दक्षिण आणि मध्य आशियासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वरिष्ठ संचालक असलेल्या लिसा कर्टिस म्हणाल्या, ‘‘शेजारील देशांवर बेकायदा आक्रमण करण्याची हिंमत इतर देश दाखवू शकणार नाही, अशा पद्धतीने युक्रेनमधील युद्ध थांबविले पाहिजे.’’
अमेरिकेच्या कोणत्याही अध्यक्षांपेक्षा ट्रम्प यांनी यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दल अधिक अनुकूल घेतली होती. आता तेसुद्धा रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबविण्याची भाषा करीत आहे. ट्रम्प हे कसे साध्य करणार याबाबत काही माहिती नाही. पण त्यांच्या या कृत्याचे काय परिणाम भोगावे लागतील, हेही पाहायला हवे, असे मला वाटते.