डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा संदर्भातील वक्तव्याविरोधात इराककडूनही तीव्र प्रतिक्रिया

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर मध्यपूर्वेत तीव्र प्रतिक्रिया
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर मध्यपूर्वेत तीव्र प्रतिक्रिया

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील लाखो फिलिस्तिनींना अन्य अरब देशांमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर मध्यपूर्वेतील राजकीय वातावरण तापले आहे. ट्रम्प यांनी जॉर्डन आणि मिस्रला गाझातील निर्वासितांना निवारा देण्याचे सुचवले होते, मात्र या प्रस्तावाला अरब देशांकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.  

इराकचे परराष्ट्र मंत्री फुआद हुसेन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "फिलिस्तिनींना त्यांच्या भूमीवरून जबरदस्तीने स्थलांतरित करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना इराकचा ठाम विरोध असेल."  

इराकच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हुसेन यांनी फिलिस्तिनी पंतप्रधान मोहम्मद मुस्तफा यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात गाझातील परिस्थिती आणि संघर्षानंतर पुनर्बांधणीसाठी संयुक्त प्रयत्न करण्यावर चर्चा केली.  

हुसेन म्हणाले, "फिलिस्तिनी नागरिकांना त्यांच्या भूमीवरून हुसकावून लावणे हा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अरब देशांनी एकत्र येण्याची गरज आहे." इराकच्या या भूमिकेनंतर अरब शिखर परिषदेत हा मुद्दा प्राधान्याने उपस्थित केला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.  

ट्रम्प यांच्या विधानावर आंतरराष्ट्रीय संताप  
ट्रम्प यांनी गाझातील स्थितीचा उल्लेख करताना सांगितले होते की, "गाझा पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. तेथील नागरिकांना शांततेत जगता यावे म्हणून त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विचार करायला हवा." त्यांनी जॉर्डन आणि मिस्र या देशांमध्ये फिलिस्तिनी निर्वासितांसाठी घरे उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मिस्र आणि जॉर्डनने याला ठाम विरोध दर्शवला आहे.  

मिस्रच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "फिलिस्तिन्यांचे जबरदस्तीने विस्थापन होऊ नये. अशा हालचालींमुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होऊ शकतो आणि संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे."  

जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान सफदी यांनीही स्पष्ट केले की, "फिलिस्तिन्यांनी त्यांच्या भूमीवरच राहिले पाहिजे. त्यांना दुसऱ्या देशात पाठवण्याच्या कोणत्याही कल्पनेला आम्ही पाठिंबा देणार नाही."  

अरब देशांची एकजूट  
इराकव्यतिरिक्त इराणनेही ट्रम्प यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इराणने म्हटले आहे की, "गाझातील जनतेला त्यांच्या भूमीवरून विस्थापित करण्याचे कोणतेही प्रयत्न म्हणजे एक मोठे मानवी संकट निर्माण करण्यासारखे आहे." संपूर्ण अरब जगतात ट्रम्प यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात असून, आगामी बगदाद येथे होणाऱ्या अरब शिखर परिषदेत हा मुद्दा प्रखरपणे मांडला जाण्याची शक्यता आहे.