नुकतेच अमेरिकेने गाझा पट्टी ताब्यात घेऊन पॅलेस्टाईन नागरिकांचे गाझाबाहेर पुनर्वसन करण्याचे वक्तव्य केले होते. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एआय-निर्मित एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये गाझाचे भविष्यातील कल्पित रूप दाखवण्यात आले आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओच सुरुवात २०२५ मधील उद्ध्वस्त गाझाच्या दृश्यांनी होते. त्यावर “पुढे काय होईल?” असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यानंतर एक गाणे वाजू लागते, ज्याचे शब्द आहेत “डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला मुक्त करतील… कोणतीही भीती नाही.”
अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर गाझा पट्टीचे आधुनिक, लक्झरी शहरात रूपांतरित झाल्याचे दाखवण्यात आले आहे. एआयच्या मदतीने तयार केलेल्या या दृश्यांमध्ये प्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क गाझामधील एका आलिशान हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेताना दिसतात. तसेच समुद्रकिनारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू विश्रांती घेताना दाखवले आहेत. तर चक्क ट्रम्प यांचा सोन्याचा पुतळा देखील उभारलेला आहे.
या व्हिडिओमध्ये युद्धग्रस्त गाझाचे चित्रण केले असून, भविष्यातील आधुनिक गाझाचे दर्शन घडवले आहे. मात्र या व्हिडिओवरून तीव्र वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी ट्रम्प यांचा समाचार घेत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची काळजी घेण्यासाठी त्यांना मतदान केले होते हे अशा प्रकारच्या गोष्टींसाठी नव्हते, असे म्हटले आहे.