अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. ते संयुक्त राज्य अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. उपराष्ट्रपती-निर्वाचित जे.डी. व्हन्स हे देखील शपथ घेणार आहेत. या समारंभासाठी त्यांचे रविवारी वॉशिंग्टन येथे आगमन झाले.
ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या अध्यक्षपदाची कारकीर्द सुरू करण्यापूर्वी कुटुंबीय, समर्थक आणि राजकीय मित्रांसह सोहळा साजरा केला. पहिल्यांदाच परदेशी नेत्यांना शपथविधी पहाण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अर्जेंटिना राष्ट्रपती जेविअर माइलि व इटलीच्या पंतप्रधान जोर्जिया मेलोनी यांसारख्या जागतिक नेत्यांना उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केले आहे.
वॉशिंग्टनपासून जवळ असलेल्या व्हर्जिनिया येथे ‘ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब’ येथे ट्रम्प यांच्या स्वागतानिमित्त आतषबाजी करण्यात आली. वॉशिंग्टनमधील तापमान कमालीचे थंड असल्याने उद्घाटनाचा संपूर्ण सोहळा सभागृहात होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा शपथविधी परंपरेप्रमाणे काँग्रेसच्या पायऱ्यांवर होतो. यंदा मात्र त्यात बदल होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने
एकीकडे ट्रम्प यांच्या आगमनाप्रीत्यर्थ आतषबाजी केली जात असताना त्यांच्या यांच्या नियोजित धोरणांना विरोध करण्यासाठी राजधानीत हजारो नागरिकांनी शनिवारी निदर्शने केली. ट्रम्प मंगळवारपासून अध्यक्षपदाचा कारभार सुरू करतील. त्यांना विरोध करण्यासाठी बिगरसरकारी संस्था सखी, ‘साउथ एशियन सर्व्हाव्हर्स’ यांनी ‘पीपल्स मार्च’अंतर्गत ट्रम्पविरोधात निदर्शने केली.