डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्समध्ये ट्रम्प गोल्फ खेळत होते. त्यामुळे ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र या घटनेत ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित आहेत. एफबीआयने आरोपीला अटक केली असून हत्येचा प्रयत्न म्हणून या घटनेचा तपास सुरू आहे. दोन महिन्यात झालेल्या दुसऱ्या हल्ल्याने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १५ सप्टेंबर) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळत होते. याचवेळी हल्लेखोराने त्यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर ट्रम्प यांच्यापासून 275 ते 450 मीटर अंतरावर होता. ही घटना कळताच सीक्रेट सर्व्हिस एजंट्सने त्यांना तात्काळ क्लबच्या होल्डिंग रूममध्ये नेले. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, संशयित हल्लेखोराकडे एके-47 रायफल होती. यासोबतच त्याच्याकडे एक GoPro देखील होता. चार राऊंड गोळ्या झाडण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.

गुप्तहेरांनी हल्लेखोरावर गोळीबार करताच तो आपली रायफल, दोन बॅकपॅक आणि इतर वस्तू घटनास्थळी सोडून कारमध्ये पळून गेला. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने त्याच्या कारचे आणि लायसन्स प्लेटचे छायाचित्र घेतले, ज्यामुळे पोलिसांना काही तासांतच त्याला पकडण्यात मदत झाली. मार्टिन काउंटीमध्ये आरोपीला अटक करण्यात आली.नंतर, गुप्तहेरांना जवळच्या झुडपातून एक AK-47 रायफल, दोन बॅकपॅक आणि इतर वस्तू सापडल्या.

दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर दोन महिन्यात दुसऱ्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांन संदेश दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी मी कोणत्याही परिस्थितीत आत्मसमर्पण करणार नाही. माझ्या जवळ गोळीबार झाला होता, परंतु अफवा नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी, तुम्ही प्रथम हे ऐकावे अशी माझी इच्छा होती: मी सुरक्षित आहे आणि ठीक आहे! मला काहीही अडवणार नाही. मी कधीही शरणागती पत्करणार नाही', असे म्हणत या हल्ल्याचा निषेध केला आहे.