परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे वांग यी
भारत आणि चीनदरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणाव हळूहळू निवळू लागला असून या देशांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे वांग यी यांच्यात सोमवारी रात्री विविध मुद्यांवर झाली.
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याबरोबरच सामाईक नद्यांच्या पाणी वाटपाच्या अनुषंगाने डेटाची आदानप्रदान करण्यावर देखील दोन्ही देशांत एकमत झाले असून भारत आणि चीनदरम्यान थेट विमान सेवा सुरू करण्याबाबतची चर्चाही बरीच पुढे सरकली आहे.
सीमावादावर स्थायी तोडगा काढण्यासाठी विशेष प्रतिनिधीच्या पातळीवर लवकरच बोलणी सुरू करण्यात येईल. भारत- चीन द्विपक्षीय संबंधांना पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या लष्कराने लडाखमधील दोन संघर्ष बिंदूंवरून माघार घेतली होती. या माघारीवर 'ब्रिक्स' देशांच्या संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी शिक्कामोर्तब केले होते. 'जी-२०' देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलची राजधानी रिओ येथे सोमवारी रात्री पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, भारताचे परराष्ट्र धोरण हे एका सिद्धांतावर आधारित आहे. कोणत्याही एका शक्तीच्या वर्चस्वाला आमचा विरोध असेल."
समान संधींचा शोध घ्यावा
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की भारत आणि चीन हे दोन्ही विकसनशील देश शेजारी आहेत. दोन्ही देशांमध्ये असमानतेपेक्षा समानताच अधिक असल्याचे दिसते. अशा स्थितीमध्ये दोन्ही देशांनी परस्परांच्या विकासाच्या संधींचा शोध घ्यायला हवा तसेच सामूहिक विकासासाठी परस्परांसोबत काम करायला हवे. दरम्यान सामान्य नागरिक, उद्योगपती आणि बुद्धिवंतांना अधिकाधिक व्हिसा देण्याचा आग्रह दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून धरण्यात आला आहे.