‘सुफी विचारधारेतूनच जगभरात वाढेल धार्मिक सौहार्द’ – प्रा. हसनैन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 8 d ago
‘आवाज द व्हॉइस’चे मुख्य संपादक आतिर खान यांची प्रा. इक्बाल एस. हसनैन यांची  यांच्याशी खास बातचीत
‘आवाज द व्हॉइस’चे मुख्य संपादक आतिर खान यांची प्रा. इक्बाल एस. हसनैन यांची यांच्याशी खास बातचीत

 

आजपासून ४६ वर्षांपूर्वी, म्हणजे १९७९ मध्ये  जगात तीन मोठ्या घटना घडल्या. इराणमध्ये धर्मक्रांती झाली, अफगाणिस्तानात सोव्हिएत संघाने आपले सैन्य घुसवले आणि मक्केत पवित्र मस्जिद अल हरमवर हल्ला झाला.

या तीनही घटनांनी मुस्लिम समाजमन ढवळून निघाले. या विषयावर प्राध्यापक इक्बाल एस. हसनैन यांनी ‘Fault Lines in Faith’ हे पुस्तक लिहिलं. त्यात १९७९ मधल्या या घटनांनी मुस्लिम समाजात विचार आणि श्रद्धा यांच्यात द्वंद कसे निर्माण झाले याचा आढावा घेतला. हसनैन जामिया हमदर्दचे प्रो-चान्सलर आणि कालीकट विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत. त्यांनी ‘आवाज द व्हॉइस’चे मुख्य संपादक अतिर खान यांनी त्यांच्याशी या सगळ्या विषयांवर विस्तृत चर्चा केली. 
 
कालीकट विद्यापीठात असताना हसनैन यांना भारतीय मुस्लिमांचं जीवन जवळून पाहायला मिळालं.  ते सांगतात, “उत्तर भारतातले मुस्लिम आणि केरळमधले मुस्लिम यांच्यात खूप फरक असल्याचे मला जाणवले.” हा फरक समजून घेऊन त्यांनी ‘द मुस्लिम्स ऑफ नॉर्थ इंडिया: फ्रोजन इन द पास्ट’ हे आणखी एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी भारतीय मुस्लिमांच्या समस्या मांडल्या आणि त्यांच्या शिक्षणावर प्रकाश टाकला. मात्र त्यांच्या अभ्यासाचा परीघ केवळ भारतापुरता मर्यादित नाही.  त्यामुळे या चर्चेत ते सूफीवाद, इस्लाम आणि मध्य-पूर्वातल्या बदलांवरही बोलले.

१९७९च्या घटना ज्यांनी बदलले मुस्लीम मानस 
हसनैन म्हणतात की १९७९ मधल्या तीन घटनांनी मुस्लिमांचा विचार आणि राजकारण बदललं. ते सांगतात, “१९७९ मध्ये घडलेल्या तीन प्रमुख घटना—इराण क्रांती, अफगाणिस्तानात सोव्हिएत संघाचा हल्ला आणि मक्केत पवित्र मस्जिदीवरचं संकट—यांनी मुस्लिमांचा विचार आणि त्यांचं राजकारण यांना नवी दिशा दिली.” 

इराण क्रांतीनंतर शिया मुस्लिमांमध्ये नवा विचार आला. त्याआधी शिया-सुन्नी भेद फारसा ठळक नव्हता, पण ही क्रांती झाली आणि शियांची ठसठशीत राजकीय ओळख पुढे आली. हसनैन म्हणाले, “ही घटना फक्त इराणपुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण मध्य-पूर्व आणि मुस्लिम समाजात शिया पुनर्जागरणाचा प्रेरणा बनली.” 

अफगाणिस्तानात सोव्हिएत संघाने हल्ला केल्यानंतर अमेरिकेने मुजाहिद्दीनना पाठिंबा दिला आणि पाकिस्तानही या युद्धात उतरलं. यावर हसनैन म्हणाले, “हा लढा फक्त राजकीय संघर्ष नव्हता, तर यातून एक विचारधारा जन्माला आली, जी आजपर्यंतच्या दहशतवादाची पायाभरणी करणारी प्रमुख विचारधारा ठरली. सौदी अरब आणि पाकिस्तानने जिहादी विचारांना चालना दिली. ” 

तर मक्केतील पवित्र मस्जिदीवर झालेल्या हल्ल्याने इस्लामिक जगतात धक्के बसले. सौदी अरबची भूमिका मजबूत झाली आणि इस्लामचं कट्टर स्वरूप जगापुढे पुढे आलं. 

इस्लामी जगतात झाला विचारांचा संघर्ष  
या घटनांनंतर दोन मोठ्या विचारधारा समोर आल्या—इराणमधून आलेली शिया विचारधारा आणि सौदी अरबमधून उगम पावलेली वहाबी विचारधारा. हसनैन सांगतात, “या दोन्ही विचारधारा एकमेकांशी भिडल्या. हा संघर्ष फक्त धार्मिक नव्हता, तर राजकीयही होता.” 

वहाबी विचारधारा सौदी अरबमधून जगभर पसरली. तिचा प्रभाव पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इतर देशांवर पडला. यावर ते पुढे म्हणाले, “हा विचार मुस्लीम जगताला मूलतत्त्ववादी वाटेवर घेऊन गेला. यामुळे त्यांच्यात असहिष्णुता पसरली आणि हिंसा वाढली.” 

सुन्नी समुदायावर याचा काय परिणाम झाला असे विचारले असता  हसनैन म्हणाले, “सुन्नी मुस्लिमांमध्ये एक नवी आक्रमकता आणि संघर्षाची भावना जन्माला आली. जी आजही समाजाच्या विकासात अडथळा ठरत आहे.” 

सूफी विचारधारा माणसांना जोडणारा पूल
हसनैन यांच्या मते सूफीवाद इस्लामी जगतातील सगळ्या संघर्षावर उपाय ठरू शकतो. ते म्हणतात, “सूफीवाद आणि हिंदू धर्मात विशेष साम्य आहे. अद्वैतवादाचा  सिद्धांत हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे. इस्लाम येण्याआधी हे तत्त्व हिंदू धर्मात होते आणि पुढे ते सूफीवादातही दिसते. इस्लाम आल्यानंतर हा विचार आणखी मजबूत झाला. अशा साम्यांमुळे  हिंदू आणि मुस्लिम समाज एकमेकांशी जोडले गेले.” मात्र आज हिंदुत्वाच्या विचारधारेने ही एकता तोडायचा प्रयत्न केला आहे,  असंही ते मानतात.

ते पुढे सांगतात, “सूफीवादात आपण ईश्वराशी प्रेम आणि श्रद्धेने जोडले जातो. दुसरीकडे हा विचार परधर्म आणि इतर संस्कृतींबद्दल आदराची भावना वाढवतो. आजच्या काळात याच सर्वसमावेशी भावनेची सर्वाधिक गरज आहे.” 

सौदी अरेबिया सुधारणेच्या दिशेने
वहाबी विचारधारेने इस्लामिक जगतात कट्टरता आणि दहशतवादाला चालना दिली असे निरीक्षण हसनैन नोंदवतात. तालिबान आणि पाकिस्तानात या विचारधारेचा मोठा प्रभाव खूप दिसला. मात्र सौदी अरेबियामध्ये जुने विचार बदलण्याचा प्रयत्न होतोय, असे ते मानतात.  

सौदी अरेबियात आता सकारात्मक बदल दिसू लागल्याचे हसनैन नोंदवतात. याविषयी म्हणाले, “प्रिन्स सलमान सत्ता हाती घेतल्यापासून जी पाऊले उचलत आहेत त्यातून सौदी समाजात सुधारणावाद पसरत असल्याचे दिसते आहे.”

या बदलांमुळे वहाबी इस्लामचा प्रभाव कमी होतोय असे ते म्हणतात. असाच बदल फ्रान्समध्येही दिसतोय. तिथे सौदीतून आलेलं वहाबी साहित्य हटवलं गेलं आहे. दोन्ही देशांत कट्टरवाद संपवून सूफीवादाला पुन्हा जागा देण्याचा प्रयत्न होतोय, असे निरीक्षण हसनैन नोंदवतात.

पश्चिमी देशातील मुस्लीम 
पश्चिमी देशांत, खासकरून फ्रान्समध्ये, इस्लामिक कट्टरवादाने संकट उभं केलं आहे. हसनैन सांगतात, “पश्चिमी देशांमध्ये खासकरून फ्रान्समध्ये  मुस्लिम समाजासमोर एक संकट निर्माण झालं आहे. तिथे लोक आपली सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी झगडत आहेत.” ते पुढे म्हणाले, “सूफीवाद या संकटावर एक संभाव्य उपाय ठरू शकतो.  कारण हि विचारधारा स्थानिक संस्कृती जपायला, तिचा आदर करायला शिकवते. लोकांना त्यांचा धर्म पाळताना समानता, एकता परधर्मियांविषयी प्रेम जोपासण्याचा अध्यात्मिक मार्ग ही विचारधारा दाखवते.” 

तालिबान बदलतेय?
तालिबानबद्दल बोलताना ते म्हणाले, “ गेल्या काही काळात तालिबानने काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. त्यावरून ते कट्टरतेकडून सूफीवादाकडे वळण्याचा प्रयत्न करताहेत असा कयास लावता येऊ शकतो. हे बदल सकारात्मक आहेत मात्र त्यात कितपत यश मिळेल हे येणारा काळच सांगेल.” 

सूफीवादा हीच नवी उमेद
हसनैन यांचं ठाम मत आहे की सूफीवाद धार्मिक एकतेची गुरुकिल्ली आहे. ते म्हणतात, “सूफीवाद नेहमीच इतर धर्मांबद्दल प्रेम आणि आदर वाढवतो. हा विचार कोणत्याही धर्माची आत्मा समजून घेऊन एकमेकांचा आदर करायला शिकवतं. भारतात सूफीवादाने हिंदू धर्म, इस्लाम आणि इतर धर्मांमध्ये पूल बांधण्याचे केलेले मोठे काम हे त्याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे.” 

ते पुढे सांगतात, “सूफीवादाचा संदेश स्पष्ट आहे—प्रेम, एकता आणि सर्व धर्मांचा आदर करणं. आणि आपल्याला आजच्या काळात याचीच सर्वाधिक गरज आहे.”

हसनैन म्हणतात १९७९ च्या घटना या केवळ इतिहासातली पाने नव्हेत. त्यांनी मुस्लिम समाजात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय बदल घडवले आहेत. यातून ज्या विचारधारा आणि चळवळी सुरू झाल्या, त्यांनी मुस्लिम जगाला नवी ओळख आणि दिशा दिली आहे. मात्र सूफीवादाच्या पुनर्जागरणातूनच समाजात प्रेम आणि एकता निर्माण होऊ शकते, असे ठाम मत प्राध्यापक इक्बाल एस. हसनैन चर्चेत शेवटी नोंदवतात.
 

- मोहम्मद अकरम


जरूर पाहा :‘आवाज द व्हॉइस’चे मुख्य संपादक आतिर खान यांनी प्रा. इक्बाल एस. हसनै यांच्याशी केलेली खास बातचीत


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter