बांगलादेशमध्ये भारतावरून नकारात्मक वातावरण तयार झालेले असताना बांगलादेशने १९७१ च्या लढाईत भारताने दिलेल्या योगदानाला कमी लेखले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिवस (१६ डिसेंबर) निमित्ताने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर बांगलादेशचे कायदा सल्लागार आसिफ नजरूल यांनी आक्षेप नोंदविला. १६ डिसेंबर हा केवळ बांगलादेशचा विजय दिवस असून यात भारताची भूमिका केवळ सहकारी म्हणून होती, असे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर त्यांनी म्हटले, "१६ डिसेंबर १९७१ हा बांगलादेशचा विजय दिवस होता. यात भारत सहकारी होता, यापेक्षा अधिक काही नाही."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, १९७१ मध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या धाडसी आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांना विजय दिवसानिमित्त अभिवादन करतो. निस्वार्थीपणा, त्यागाची भावना आणि अतूट संकल्पामुळे देशाचे संरक्षण झाले आणि विजय मिळवला. त्यांच्या असामान्य शौर्याला आणि दृढ भावनांना श्रद्धांजली. या पोस्टवर बांगलादेशने आक्षेप घेतला आहे.
१६ डिसेंबर हा दिवस बांगलादेश विजय दिवस म्हणून साजरा करतो. यावेळी यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हंगामी सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी संस्थापक शेख मुजीबुर्रमान यांचा उल्लेख केला नाही. परंतु त्यांची कन्या शेख हसीना यांची राजवट जगातील सर्वात वाईट कारकीर्द असल्याचे सांगितले. बांगलादेशच्या या भूमिकेमुळे भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या भूमिकेने उभय देशातील संबंधात तणाव आला आहे. एकीकडे भारतापासून दूर राहणाऱ्या बांगलादेशने आता पाकिस्तानसमवेत संबंध दृढ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारताने १९७१ मध्ये बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात मोलाची भूमिका बजावलेली आहे.