मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे भारतात प्रर्यापण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भारतीय तपास संस्थांनी त्याच्या प्रत्यार्पणाच्या तयारीला वेग आणला असल्याचे समजते. भारताच्या ताब्यात न जाण्यासाठी अनेक वर्षांपासून कायदेशी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या राणाला भारताच्या ताब्यात देण्याचा आदेश अमेरिकेतील अपिलीय न्यायालयाने दिला आहे.
मूळ पाकिस्तानी वंशाचा आणि कॅनडाचा नागरिक असलेला राणा मागील काही वर्षांपासून अमेरिकेतील तुरुंगात आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तहव्वूर राणाचा सहभाग असल्याचा भारताचा आरोप आहे.
लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दहा दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हीड हेडली याला राणाने मदत केल्याचे भारताचे म्हणणे आहे. हल्ल्यात राणाचा सहभाग असल्याचे पुरावे देत भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी अर्ज केला होता. या अर्जावर खटला चालून जिल्हा न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली होती. त्या परवानगीविरोधात राणाने अपील केले होते. अपिलीय न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात त्याचा हा अर्ज नामंजूर करत आधीच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
- पीटीआय
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter