इस्राईलच्या गाझावरील हल्ल्यात ४०४ नागरिकांचा मृत्यू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 10 d ago
इस्राईलने केलेल्या गाझावरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक.
इस्राईलने केलेल्या गाझावरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक.

 

इस्राईलच्या सैन्याने मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हमासला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात ४०४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हत्येमुळे इस्त्राईल आणि हमास यांच्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेली शस्त्रसंधी तुटली आहे. हल्ल्यांपूर्वी इस्त्राईलने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाशी चर्चा केली होती, असे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने सांगितले.

इस्राईलने हमाससोबत १९ जानेवारीला शस्त्रसंधी करार केला होता. हा युद्धबंदीचा करार तोडून इस्राईलने गाझा पट्टीच्या विविध भागांवर हल्ले केले. हल्ल्यांमध्ये गाझा शहर, खान युनूस, राफा आणि मध्य गाझा या भागांचा समावेश आहे. गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रमजान महिन्यात झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये मुले, महिला आणि वृद्धांचा मोठा समावेश आहे. सुमारे १५० लोक जखमी झाले आहेत. गाझातील हमासच्या पोलिस प्रमुख महमूद अबू यत्फा या हल्ल्यात ठार झाले आहेत.

रॉपटर वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्राईल पुन्हा पायदळाच्या साहाय्याने गाझावर हल्ला करण्याची योजना आखत आहे. 'इस्राईल डिफेन्स फोर्सेस' (आयडीएफ) ने एक पोस्टमध्ये म्हटले आहे की, राजकीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमुळे इस्त्राईलने गाझा सीमेलगतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

शस्त्रसंधीच्या चर्चेतील गोंधळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. इस्त्राईलला शस्त्रसंधी कराराचा पहिला टप्पा वाढवायचा होता, परंतु हमासने त्याला नकार दिला. दुसऱ्या टप्प्यात गाझाच्या संपूर्ण निशस्त्रीकरणाचा मुद्दा असावा, अशी इस्त्राईलची अपेक्षा होती. त्यामुळे शस्त्रसंधीवरील चर्चा थांबली आहे.

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, हमासने अपहृतांची सुटका करण्यास नकार दिल्यामुळे आणि अमेरिकेच्या मध्यस्थांच्या सर्व प्रस्तावांना धुडकावल्यामुळे हल्ल्याचा आदेश दिला. नेतान्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले की, युद्धाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इस्त्राईल सैन्याने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हल्ले सुरू केले आहेत.

हमासने यावर प्रतिक्रिया व्यक्त करत इस्त्राईलवर टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, नेतान्याहू यांनी युद्ध पुन्हा सुरू करून अपहृतांचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला आहे. नेतान्याहू राजकीय संरक्षणासाठी युद्धाचा वापर करत आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter