गेल्या दोन आठवड्यांपासून गाझा पट्टीत इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष तीव्र झाला आहे. यामुळे सुमारे २,८०,००० गाझावासी नव्याने विस्थापित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्राईलने पुन्हा एकदा विस्थापनाचे आदेश जारी केले आहेत. यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी पळावे लागत आहे.
OCHA च्या अहवालानुसार, विस्थापित झालेल्या गाझातील नागरिकांना आता मोजक्याच उपलब्ध निवाऱ्यांमध्ये राहण्यास भाग पडले आहे. ही घरे आधीच खचाखच भरलेली असून आता नव्याने येणाऱ्या लोकांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या ठिकाणी स्वच्छतेच्या साधनांचा तीव्र अभाव आहे. फ्ली आणि माइट्सच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना त्वचेवर पुरळ, खाज आणि इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. गाझामध्ये सध्या स्वच्छतेची साधने आणि औषधे यांचा पुरवठा जवळपास बंद आहे. यामुळे या समस्यांवर मात करणे कठीण झाले आहे.
मानवीय मदतीवर बंदी: अन्न आणि मूलभूत गरजांचा अभाव
गेल्या एका महिन्यापासून गाझामध्ये सर्व प्रकारच्या मानवीय मदतीवर आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर इस्राईलने पूर्णपणे बंदी घातली आहे. यामुळे गाझातील लोकांना अन्न, पाणी, औषधे आणि इंधनासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे. OCHA ने सांगितले की, गाझामध्ये सध्या अन्न सहाय्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे. तरीही, संयुक्त राष्ट्र आणि त्यांच्या भागीदार संस्था परिस्थितीच्या मर्यादेत गाझातील लोकांच्या प्रचंड गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अन्न सुरक्षा भागीदारांनी आतापर्यंत दररोज सुमारे ९,००,००० जणांना जेवणांचे वाटप केले आहे. OCHA ने तातडीने गाझामध्ये मालवाहतूक आणि मानवीय मदतीसाठी क्रॉसिंग्ज पुन्हा उघडण्याची मागणी केली आहे. यामुळे लोकांना किमान मूलभूत गरजा तरी भागवता येतील.
इस्राईलच्या लष्कराने बुधवारी उत्तर गाझा पट्टीतील अनेक भागांतील नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले. इस्राईलच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, पॅलेस्टाईनच्या हद्दीतून रॉकेट हल्ले झाल्यामुळे ही कारवाई करावी लागत आहे. लष्करी प्रवक्ते अविचाय अड्राई यांनी एका निवेदनात म्हटले, “उत्तर गाझातील रहिवाशांनी तातडीने गाझा शहरातील पश्चिमेकडील निवाऱ्यांमध्ये जावे. काही दहशतवादी संघटना नागरिकांमध्येच लपून हल्ले करत आहेत. ज्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.” मात्र, या विस्थापन आदेशांमुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत. गाझा शहरातील पश्चिमेकडील निवारेही आता सुरक्षित राहिलेले नाहीत. याठिकाणी स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
गाझातील परिस्थिती
गाझामधील सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे लाखो लोक विस्थापित झाले आहेत. युद्ध, रोग, विध्वंस आणि भूक यांचा सामना करणाऱ्या गाझावासीयांसाठी आता फ्ली आणि माइट्ससारख्या समस्याही डोके वर काढत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मते, गाझामध्ये मानवीय मदतीवरील निर्बंध तातडीने हटवणे गरजेचे आहे. अन्यथा ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. गाझातील अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधांचा तीव्र अभाव असल्याने तिथल्या नागरिकांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter