तिबेटमध्ये मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान भूकंपाचा ६.८ रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का बसला. या शक्तिशाली भूकंपात १२६ जणांचा मृत्यू झाला असून १८८ जण जखमी झाले आहेत. शेजारील नेपाळ आणि भारताच्या काही भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. तेथील इमारती हादरल्याने भयभीत होऊन लोक रस्त्यावर पळाले. उत्तर भारतातही हे धक्के जाणवले.
प्रमाणवेळेनुसार आज सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक विभागानुसार हा धक्का ७.१ रिश्टर स्केलचा होता. चीनची सरकारी वृत्तसंस्था 'शिन्हुआ'ने दुपारी दिलेल्या माहितीनुसार या भूकंपात १२६ जणांचा मृत्यू झाला तर १८८ जण जखमी झाले आहेत. तिबेट हा चीनचा स्वायत्त भाग असल्याचा दावा चीनकडून केला जातो. या भागात भूकंप झाल्याने तेथे मदत आणि बचावकार्य करण्याचा आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे.
जखमींवर सर्व उपचार करण्याचा आदेश देत दुसरी आपत्ती टाळण्यासाठी आणि बाधित रहिवाशांचे योग्यरीत्या पुनर्वसन प्रभावीपणे करण्याचे आवाहन त्यांनी केले. चीनच्या भूकंप प्रशासनाने भूकंपानंतर दुसऱ्या श्रेणीची आपत्कालीन सेवा प्रतिसाद लागू करीत घटनास्थळी बचाव पथकांना पाठवून तातडीने मदतकार्य सुरू केले. शिसँगनेही 'श्रेणी- २' आपत्कालीन सेवेचा संदेश जारी केला. भूकंप झालेल्या अति उंचावरील आणि थंड प्रदेशात सुती कापडाचे तंबू, पांघरूणे, बिछान्यांसह २२ हजार वस्तू पाठविण्यात आल्या. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या मदतीसाठी स्थानिक अग्निशमन दलाचे दीड हजार कर्मचारी जवान आणि बचाव पथकेही पाठविली.
एकापाठोपाठ धक्के
भूकंपाचे केंद्र हिमालय पर्वतरांगातील ईशान्य नेपाळच्या लोबुत्सेच्या ९० किलोमीटर उत्तर-पूर्वेस होता. दहा किलोमीटर खोलीवर भूकंप झाला, असे वृत्त 'शिन्हुआ'ने दिले आहे. राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार शिगेझमध्ये आज सकाळी साडेसहाला भूकंपाचा ७.१ तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यानंतर सात वाजून दोन मिनिटांनी ४.७, ७ वाजून सात मिनिटांनी ४.९ क्षमतेचा आणि सात वाजून १३ मिनिटांनी पाच रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. भूकंपाच्या मालिकेमुळे लोकांनी घरातून बाहेर पडून खुल्या जागी आश्रय घेतला.
एव्हरेस्टच्या परिसरात बंदी
तिबेटमधील 'डिंगरी काउंटी'त आज भूकंपामुळे मोठी हानी झाली. यानंतर चीनने एव्हरेस्ट पर्वताच्या बाजूचे निसर्गरम्य क्षेत्र पर्यटकांसाठी बंद केले. जगातील सर्वांत उंच असलेल्या एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी डिंगरीचा बेस कॅम्प म्हणून वापर होतो.