भारताच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने जगातील सर्वांत मोठे धरण उभारणीला तत्त्वतः मान्यता दिल्याने भारत आणि बांगलादेशच्या चिंता वाढल्या आहेत.
या प्रकल्पाबाबत तूर्त भारत सरकारने 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली असली तरीसुद्धा भविष्यात याबाबत आक्षेप नोंदविला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. तिबेटमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचा मुख्यप्रवाह यू-टर्न घेऊन अरुणाचल प्रदेश येतो आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये प्रवेश करतो त्याच ठिकाणावर हे अवाढव्य धरण उभारण्याचे नियोजन चीन सरकारने आखले आहे. या धरणामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर पूर्णपणेचीनचे नियंत्रण प्रस्थापित होईल आणि हेच सर्वाधिक धोकादायक असल्याचे मानले जाते. विशेषतः पावसाळ्यामध्ये या नदीतील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून एखाद्या देशामध्ये पूरस्थिती निर्माण केली जाऊ शकते किंवा त्या भागामध्ये कृत्रिम दुष्काळ पाडला जाऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पर्यावरणतज्ज्ञांनी या प्रकल्पाला आक्षेप घेतला असला तरीसुद्धा चीनने मात्र त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नसल्याचे म्हटले आहे. या जलविद्युत प्रकल्पातून दरवर्षी तीनशे अब्ज किलोवॉट अवर एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती होईल. यामुळे दरवर्षी तीनशे दशलक्ष लोकांच्या ऊर्जेची गरज भागू शकेल.
अवाढव्य गुंतवणूक
या महाकाय प्रकल्पावर एक ट्रिलियन युआनपेक्षा (१३७ अब्ज डॉलर) अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे. चीनमध्ये सध्या जगातील तीन मोठे जल विद्युतप्रकल्प असून त्यात आणखी एकाची भर पडणार आहे. अरुणाचल प्रदेशात भारतदेखील ब्रह्मपुत्रा नदीवर धरण उभारत असून साधारणपणे २००६ पासून त्याच्या उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. नदीच्या पाणीवाटपावरून वाद होऊ नये म्हणून दोन्ही देशांनी चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter