कॅनडाचे विद्यामान पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ७ जानेवारीला पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पुढील पंतप्रधान निवडण्यासाठी टोरांटोमध्ये रविवारी कॅनडाच्या सत्ताधारी लिबरल पार्टीचे अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात मार्क कार्नी यांना ८५.९ टक्के मते मिळाली असून ते कॅनडाचे पुढील पंतप्रधान म्हणून काम करतील.
मार्क कार्नी यांची पंतप्रधान पदी निवड झाल्यानंतर भारताने आशा व्यक्त केली की, कार्नी यांच्या नेतृत्वात भारताचे आणि कॅनडाचे संबंध पुन्हा सुधारू शकतील. त्यासाठी त्यांना कॅनडामधील खलिस्तानी शीख कट्टरवाद्यांच्या भारताविरोधी क्रियाकलापांविषयी तोडगा काढावा लागेल.
कॅनडाचे पूर्ण पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तान समर्थक फुटीरतावादी नेते हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताने हे आरोप त्वरित फेटाळून लावले होते. कॅनडाने आम्हाला कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत असे म्हणत भारताने कॅनडा सरकारवर आरोप केले होते. या नंतर भारत-कॅनडा संबंधांत तणाव निर्माण झाला होता.
मात्र, कार्नीने भारताशी संबंध सुधारण्याची तयारी दाखवली आहे. कार्नी म्हणाले, "कॅनडा आपल्या व्यापार संबंधांना विविध देशांशी विस्तारित करण्याचा विचार करत आहे. यामध्ये भारतासोबतचे संबंध पुन्हा मजबूत करण्याची संधी आहे. भारतासोबतचे व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी आपल्याला समान मूल्यांवर आधारित एक सामाईक दृषटिकोन आवश्यक आहे.”
भारताने कार्नी यांच्या व्यक्तव्याचे स्वागत करत म्हटले की, भारत कधीही कॅनडाच्या भारताशी संबंध सुधारण्याच्या कोणत्याही प्रयत्नाचे स्वागत करेल. मात्र त्यासाठी खलिस्तानी शीख कट्टरवाद्यांच्या क्रियाकलापांविषयी भारताच्या चिंता दूर कराव्या लागतील. तसेच आतंकवादी आणि अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रत्यार्पणासाठीच्या मागण्यांची त्वरित मंजुरी दिली जावी.
भारत आणि कॅनडा यांच्यात Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) च्या चर्चेला २०१० मध्ये सुरूवात झाली होती. पण काही वर्षांपासून ती थांबली आहे. कार्नी यांच्या नेतृत्वात CEPA कराराच्या चर्चेसाठी पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter