अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातील शीख यात्रेकरूंना त्यांच्या धार्मिक स्थळाला भेट देता यावी याकरता पाकिस्तानात पोहोचल्यानंतर ३० मिनिटांच्या आत मोफत ऑनलाईन व्हिसा मिळणार आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्की यांनी केली. गुरुवारी लाहोरमध्ये शीख यात्रेकरूंच्या ४४ सदस्यीय परदेशी शिष्टमंडळाची भेट घेत असताना नक्वी यांनी हे वक्तव्य केलं.
मंत्र्यांनी पाकिस्तानात शीख यात्रेकरूंचे जोरदार स्वागत केले. गृह मंत्रालयाने दिलेल्या निवदेनानुसार पूर्वी पाकिस्तानला भेट देताना शीख यात्रेकरूंना अडचणींचा सामना करावा लागला हे त्यांनी मान्य केलं.
शीख यात्रेकरूंना कोणत्याही शुल्काशिवाय 30 मिनिटांत व्हिसा मिळेल
नक्वी म्हणाले की, सरकारने शीखांसाठी व्हिसा प्रक्रिया ऑनलाईन करून सुलभ केली आहे. अमेरिकन, कॅनेडिअन आणि इंग्लडचे पासपोर्टधारक ऑनलाईन अर्ज करू शकतात. कोणत्याही शुल्काशिवाय ३० मिनिटांच्या आत त्यांचा व्हिसा प्राप्त करू शकतात. ही सुविधा भारतीय वंशांच्या शीखांसाठीदेखील आहे. शीख समुदायाला अधिकाधिक सुविधा देणे हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्ही वर्षांतून १० वेळा पाकिस्तानात येऊ शकता आणि आम्ही प्रत्येकवेळी तुमचे स्वागत करू, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी नक्वी असंही म्हणाले की, पाकिस्तानात व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. आता १२४ देशांतील नागरिकांसाठी व्हिसा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. हे धोरण पाकिस्तानला एक आकर्षक पर्यटन आणि गुतंवणुकीचे ठिकाण बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊस आहे. पाकिस्तानने १४ ऑगस्टपासून या देशांच्या नागरिकांसाठी ही सुविधा सुरू केली आहे.
नक्वी म्हणाले, ज्याप्रमाणे सौदी अरेबिया मुस्लिमांसाठी पवित्र आहे. तसंच पाकिस्तान शीख समुदायासाठी पवित्र आहे. पाकिस्तानामधील अनेक शीख वारसा स्थळे खुली जातील आणि त्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. शीख यात्रेकरूंची संख्या दरवर्षी १ लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.