अमेरिकेतील आणि भारतातील EVMमध्ये मुलभूत फरक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गॅबार्ड
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गॅबार्ड

 

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गॅबार्ड यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टम्स (ईव्हीएस) हॅकिंगला बळी पडू शकतात आणि त्याद्वारे निवडणूक निकालांमध्ये फेरफार शक्य आहे, असे वक्तव्य केलं. यानंतर भारताच्या निवडणूक आयोगाने (ईसीआय) आपल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) च्या विश्वासार्हतेवर भाष्य केले आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, “भारतीय ईव्हीएम अचूक आणि विश्वासार्ह गणकयंत्रणा आहेत.” गॅबार्ड यांनी अमेरिकेतील ईव्हीएसबाबत चिंता व्यक्त केली होती. यामुळे भारतातील ईव्हीएमच्या सुरक्षिततेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

१० एप्रिलला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत तुलसी गॅबार्ड यांनी सांगितले की, गुप्तचर विभागाकडे पुरावे आहेत की अमेरिकेतील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टम्स हॅकिंगद्वारे निकाल बदलण्यास असुरक्षित आहेत. त्यांनी कागदी मतपत्रिकांवर आधारित निवडणूक प्रणालीचा पुरस्कार केला. यावर प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की अमेरिकेतील ईव्हीएस आणि भारतातील ईव्हीएम यांच्यात मूलभूत फरक आहे.

निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “अमेरिकेतील ईव्हीएस ही अनेक यंत्रणा, प्रक्रिया आणि खासगी नेटवर्क्स (इंटरनेटसह) यांचा समावेश असलेली जटिल प्रणाली आहे. याउलट, भारतीय ईव्हीएम ही स्वतंत्र यंत्र आहेत. ही मशीन इंटरनेट, वाय-फाय किंवा इन्फ्रारेडशी जोडली जाऊ शकत नाहीत. या यंत्रांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांच्या उपस्थितीत या यंत्रांची चाचणी आणि मॉक पोलद्वारे तपासणी केली जाते. आतापर्यंत ५ कोटींहून अधिक व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) स्लिप्स राजकीय पक्षांच्या समक्ष तपासल्या गेल्या आहेत आणि त्या जुळल्या आहेत.”

ईव्हीएमची रचना आणि विश्वासार्हता
भारतीय ईव्हीएममध्ये दोन भाग असतात. कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट, हे युनिट एका केबलद्वारे जोडलेले असतात. कंट्रोल युनिट निवडणूक अधिकाऱ्यांकडे असते, तर बॅलेट युनिट मतदानासाठी मतदार कक्षात ठेवले जाते. निवडणूक आयोगाने सांगितले की, “ईव्हीएमची रचना आणि चाचणी अत्यंत कठोर प्रक्रियेतून होते.  ईव्हीएमच्या निर्मितीच्या सुरुवातीपासूनच त्याची चाचणी सर्वात कठीण परिस्थितीत केली जाते. सांख्यिकीय तत्त्वांनुसार त्यांची कार्यक्षमता तपासली जाते. त्यामुळे ईव्हीएमची रचना आणि मतदान प्रक्रिया पूर्णपणे विश्वासार्ह आहे.”

आयोगाने पुढे सांगितले की, “भारतीय ईव्हीएमना सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी वेळोवेळी तपासले आहे आणि त्यांनी या यंत्रांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.  भारतीय ईव्हीएमची तंत्रज्ञान आणि प्रक्रिया इतर देशांपेक्षा वेगळी आणि अतुलनीय आहे.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter