बांगलादेशमधून होणारी घुसखोरी तस्करी आणि मानवी तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पारंपरिक पद्धतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. या दोन्ही देशादरम्यान असलेली ९१३ किलोमीटर सीमेचे रक्षण करणारे बीएसएफच्या 'साऊथ बेंगॉल फ्रंटियर 'ने टेहळणी चौक्या आणि प्रत्यक्ष गस्त या पारंपरिक पद्धतींसह इलेक्ट्रॉनिक साधनांनी टेहळणीची पद्धत अवलंबली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
'साऊथ बेंगॉल फ्रंटियर' भारत- बांग्लादेशातील गस्त घालत असलेल्या या सीमेपैकी ९१३ किलोमीटरपैकी सुमारे निम्म्या सीमेवर कुंपणच नसल्याने सीमा सुरक्षा दल तस्करी आणि मानवी तस्करी रोखण्यासाठी विविध पद्धती, प्रतिबंधक उपाय अवलंबत आहे. या सीमाप्रदेशातील भूभाग हा नद्यांचा,
पाणथळ आणि दुर्गम आहे. जेथे कुंपण नाही तेथे हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी 'पॅन, टिल्ट आणि झूम' (पीटीझेड) कॅमेरे मोठ्या संख्येने लावण्यात आले आहेत. रात्रीच्या अंधारातही हालचाली टिपण्याची (नाईटव्हिजन) क्षमता या कॅमेऱ्यांत आहे.
कोलकत्यापासून ११० किलोमीटरवर असलेल्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पेट्रोपोल येथे पत्रकारांच्या आयोजित केलेल्या दौऱ्यात या अधिकाऱ्याने सांगितले, की या कॅमेऱ्यांद्वारे टिपलेली माहिती नियंत्रण कक्षांतून गस्ती पथकांना दिली जाते. पेट्रापोलजवळील सीमा सुरक्षादलाच्या एका बटालियनच्या कक्षेतील ३२ किलोमीटरच्या सीमेपैकी अवघ्या ११ किलोमीटर सीमेवर कुंपण घातलेले आहे. उर्वरित सीमेवर पारंपरिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कॅमेऱ्यांच्या मदतीने गस्त घातली जाते.
'स्मार्ट कुंपण' उभारणार
■ सर्व प्रकारची तस्करी आणि घुसखोरी रोखण्यासाठी मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि संसाधनांचा योग्य पद्धतीने वापर केला जातो. कुंपण नसलेल्या भागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त 'स्मार्ट कुंपण' घालण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे आणि 'बीएसएफ'ची गरज लक्षात सीमाभागातील काही जमीन राज्य प्रशासनाने 'बीएसएफ 'कडे सुपूर्द केली आहे.