इस्राइलने केलेल्या अत्याचारांच्या मानाने त्यांना दिलेली शिक्षा कमीच - अयातुल्ला खामनेई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 13 h ago
अयातुल्ला खामनेई. फाईल फोटो
अयातुल्ला खामनेई. फाईल फोटो

 

ईरानचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांनी शुक्रवारी तेहरानमध्ये जुम्मा नमाजानंतर हजारो उपस्थितांना संबोधित केले. हे त्यांच्या गेल्या पाच वर्षांतील हे त्यांचे पहिले मोठे सार्वजनिक भाषण होते. या भाषणात खामनेई यांनी इस्राएलविरोधातील आक्रमक भूमिका स्पष्ट केली आणि इस्राएलवरील अलीकडील क्षेपणास्त्र हल्ल्यांचा उल्लेख केला. त्यांनी या हल्ल्याला इस्राएलच्या 'अत्याचारांविरोधातील किमान शिक्षा' असे संबोधले.

खामनेई यांनी इस्लामिक राष्ट्रांना एकत्र येण्याचे आणि परस्परांवर प्रेम करण्याचे आवाहन केले. त्यांनी इस्राएल आणि त्याच्या समर्थकांना इस्लामिक राष्ट्रांचे मुख्य शत्रू म्हणून संबोधले आणि इस्राएलविरोधातील लढाईला पाठिंबा दिला. त्यांनी  पॅलेस्टाईनच्या प्रतिकाराला योग्य ठरवले. 'मुस्लिम देशांनी आपले संरक्षण अधिक मजबूत करून एकत्रितपणे आपल्या शत्रूंना पराभूत करणे आवश्यक आहे.', अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

खामनेई यांनी या भाषणात आंतरराष्ट्रीय राजकारण, विशेषतः इस्लामिक देशांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, 'पॅलेस्टाईनचा प्रश्न हा संपूर्ण मुस्लिम जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.' यावेळी त्यांनी इस्राएलच्या कृत्यांचा तीव्र निषेध केला आणि पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी लढा देणाऱ्या गटांना समर्थन दर्शवले.​