ऑस्ट्रेलियात सोशल मिडीयावर अल्पवयीन 'लॉग आउट'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

युवा पिढीचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियात अनेक उपाय योजले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे १६ वर्षांखालील मुला-मुलींना सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तशी घोषणा पंतप्रधान अँथोनी अल्बानिज यांनी गुरुवारी केली.

सोशल मीडिया व्यासपीठावरील कंपन्यांनी नवी नियमावली जाहीर करावी अथवा त्यांना संभाव्य दंडाला सामोरे जावे लागेल, अशा इशारा त्यांनी दिला आहे. अल्बानिज म्हणाले, "सोशल मीडियामुळे मुलांचे नुकसान होत आहे. त्यांचा वेळही वाया जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या महिनाअखेरीस कायदा करणार आहे." मुलांना सोशल मीडियापासून रोखण्याची जबाबदारी पालकांवर नाही तर कंपन्यांवर आहे, असे अल्बानिज सोशल यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त 'ब्लूमबर्ग'ने दिले आहे.

सोशल मीडियामुळे चुकीची माहिती पसरण्याचे प्रमाण वाढले असून मानसिक आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचे अल्बानिज यांचे म्हणणे असून त्या नावाखाली तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या नाड्या आवळण्याचे पंतप्रधानांच्या डाव्या-मध्यम विचारसरणीच्या मजूर पक्षाचे धोरण आहे.

सोशल मीडियाचे संचालन करणाऱ्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना आव्हान देण्याचा ऑस्ट्रेलियाचा इतिहास आहे. फेसबुक व गुगलला बातम्यांसाठी माहिती पुरविण्यास पैसे देण्याचे निर्देश देण्यात आले होते. सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ 'एक्स'वरून न काढल्याने एलॉन मस्क यांच्या 'एक्स' कंपनीला सरकारने न्यायालयात खेचले होते. 

'कायदा प्रभावी ठरण्याची अपेक्षा नाही'
कायदा करून सोशल मीडियाचा अतिवापर रोखणे किंवा समस्येचे त्वरित निराकरण होईल, अशी माझी अपेक्षा नाही, अशी कबुली अल्बानिज यांनी दिली. यासाठी त्यांनी मद्यपानावरील निबंधाचे उदाहरण दिले. अल्पवयीन मुलांमधील मद्यपान रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांना अपयश आल्याचे ते म्हणाले.