राहत फतेह अली खान यांना अटक ही निव्वळ अफवाच

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
Rahat Fateh Ali Khan
Rahat Fateh Ali Khan

 

पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांच्या अटकेची बातमी आली होती. पाकिस्तानच्या जियो न्यूजने दिलेल्या अहवालानुसार, त्यांचे माजी व्यवस्थापक सलमान अहमद यांनी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यामुळे दुबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मात्र, आता राहत फतेह अली खान यांनी समोर येऊन या बातम्यांना खोटे ठरवले आहे.

राहत फतेह अली खान यांनी म्हटले की, त्यांच्या चाहत्यांनी अशा खोट्या अफवांकडे अजिबात लक्ष देऊ नये. ते दुबईमध्ये पूर्णपणे ठीक आहेत. त्यांनी असेही सांगितले की, ते दुबईमध्ये आपल्या गाण्यांची रेकॉर्डिंग करण्यासाठी गेले आहेत.

मनी लाँड्रिंग-करचुकवेगिरीचा आरोप
या वर्षाच्या सुरुवातीला, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) राहत फतेह अली खानवर कारवाई केली होती. राहतवर १२ वर्षांत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संगीत मैफिलीतून अंदाजे ८ अब्ज रुपये कमावल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत एजन्सीने गायकाविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू केली.
 
अडचणीत राहत फतेह अली खान
या वर्षाच्या जानेवारीत त्यांचा एक व्हिडिओ जोरात व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते आपल्या नोकराला मारहाण करताना दिसले होते. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र, नंतर त्यांनी त्या घटनेबद्दल माफी मागितली होती.

राहत फतेह अली खान यांचे करिअर
राहत फतेह अली खान पाकिस्तानातील एक मोठे नाव आहे. त्यांनी पाकिस्तानसह बॉलिवूड चित्रपटांसाठीही अनेक गाणी गायली आहेत. 'जरूरी था', 'तू इतनी खूबसूरत है', 'मैं जहां रहूं', 'तुम्हें दिल्लगी भूल जानी पड़ेगी' ही त्यांच्या काही लोकप्रिय गाणी आहेत. त्यांनी १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या पाकिस्तानी चित्रपट 'मर्द जीने नहीं देते' मधून पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्यांनी 'किसी रोज मिलो हमें शाम ढले' हे गाणे गायले होते.

बॉलिवूडमधील पदार्पण
बॉलिवूडमध्ये त्यांनी २००३ मध्ये कदम ठेवला. पूजा भट्टच्या दिग्दर्शनाखाली 'पाप' नावाचा एक चित्रपट आला होता, ज्यामध्ये उदिता गोस्वामी, गुलशन ग्रोवर, जॉन अब्राहम यांसारखे तारे दिसले होते. या चित्रपटासाठी राहत यांनी 'मन की लगन' हे गाणे गायले होते.
 
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter