भारत-पाकिस्तानने संयम राखावा - UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस

 

भारत आणि पाकिस्तानातील सध्याच्या तणावावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस लक्ष ठेऊन आहेत. "दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि परिस्थिती आणखी चिघळणार नाही, याची काळजी घ्यावी," असे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या प्रवक्त्यांनी केले आहे. 

गुटेरस यांचे प्रवक्ते स्टीफन ड्युजेरीक यांनी वरील आवाहन केले. गुटेरस यांनी भारत आणि पाकिस्तानच्या सरकारशी संपर्क केला आहे का, या प्रश्नावर ते बोलत होते. "गुटेरस यांनी दोन्ही देशांशी संपर्क केलेला नाही. मात्र, सध्याच्या तणावावर संयमाने मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे," असे त्यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणतेही मुद्दे शांततापूर्ण चर्चेतून सोडविता येऊ शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सामान्य नागरिकांवर होणारे हल्ले स्वीकारार्ह नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचे समर्थन होऊ शकत नाही, या शब्दांमध्ये भारतीय नेत्यांसह संयुक्त राष्ट्रांतील वरिष्ठ नेत्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. संयुक्त राष्ट्रांतील भारतीय कार्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. आमसभेचे अध्यक्ष फिलेमन यांग यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. सर्व देशांनी या घटनेचा निषेध करून भारताला साथ द्यावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री जितीनप्रसाद यांनी केले. 

'तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण हवे' 
"तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण झाले पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे. त्यामुळे, सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांचे तंत्रज्ञान जगाला देण्याची आमची तयारी आहे," अशी भूमिका भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्रांत मांडण्यात आली. भारताच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्यमंत्री जितीनप्रसाद यांनी वरील भूमिका मांडली. भारतातील डिजिटल तंत्रज्ञानाचे यश हा जगासमोर आदर्श आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.