‘इतक्या’ भारतीयांना अमेरिका पाठवणार मायदेशी?

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 5 d ago
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

 

नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. ट्रम्प यांनी एका दिवसात ४२ निर्णय घेतले आहेत. यामध्ये अमेरिकेत अवैधपणे किंवा अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.  या निर्णयामुळे वीस हजार भारतीयांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

अमेरिकेन प्रशासनाच्या माहितीनुसार, जवळपास २० हजार भारतीय नागरिक अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. या नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश लवकरच दिले जाण्याची शक्यता आहे. लवकरच यासंदर्भातील अंतिम आदेश जारी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.  

यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) च्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२४ पर्यंत २० हजार ४०७ भारतीय नागरिकांना अमेरिकेने अवैध घोषित केलं आहे. अमेरिकेच्या मते हे नागरिक अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेत दाखल झाले आहेत. यापैकी २ हजार ४६७ नागरिक इमिग्रेशन डिटेन्शन कॅम्पमध्ये बंद आहेत. तर अमेरिकेने १७ हजार ९४० भारतीयांना 'पेपरलेस' घोषित केलं आहे. 

प्यू रिसर्च २०२४ च्या अहवालानुसार अमेरिकेच्या मते त्यांच्या देशात अपुऱ्या कागदपत्राद्वारे दाखल होणाऱ्यांमध्ये भारतीय तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमाकांवर मेक्सिको, तर दुसऱ्या क्रमांकावर सल्वाडोर मधील नागरिकांचा समावेश आहे. 

२०२४ मध्ये अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम्स विभागाने २ लाख ७० हजार अवैध नागरिकांना त्यांच्या देशात पाठवलं आहे. यात भारतीयांचाही समावेश आहे. २०२४ मध्ये अमेरिकेने अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे दाखल झालेल्या १५२९ भारतीयांना परत पाठवलं आहे. 

अमेरिकेत अवैध ठरलेले भारतीय नागरिक विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. त्यामध्ये अनेक भारतीय तंत्रज्ञान, आरोग्य, आणि अन्य महत्त्वाच्या सेवा क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील अनेक भारतीय कुटुंबांना भविष्यात नवा रोजगार मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter