नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत दहशतवादी हल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमेरिकेत न्यू ऑरिलियन्समध्ये नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांच्या गर्दीत ट्रक घुसवून हल्ला करण्यात आला. यानंतर चालकाने गोळीबारही केला. न्यू ऑरिलियन्सच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. एफबीआयकडूनही यादृष्टीने तपास सुरू आहे. या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ट्रकने चिरडल्यानंतर रस्त्यावर रक्तामांसाचा चिखल झाला होता. अनेक जखमी लोक तीव्र वेदनेने विव्हळत रस्त्यावर पडले होते. घटनेचे भीषण आणि अंगावर काटा आणणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

न्यू ऑरलियन इथं झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसंच या घटनेची एफबीआयकडून चौकशी सुरू असून दहशतवादी हल्ला असल्याच्या दृष्टीकोनातून तपास केला जात आहे अशी माहिती बायडेन यांनी दिली. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने या घटनेनंतर दाखवलेलं धाडस आणि केलेलं काम प्रशंसनिय आहे. त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्यानं या घटनेतील जखमींवर वेळीच उपचार करता आले. तसंच हल्लेखोराला रोखल्यानं पुढील अनर्थ टळला असंही बायडेन यांनी म्हटलं.

सकाळी घडलेल्या या घटनेनंतर आतापर्यंतची प्रत्येक माहिती मला दिली जात आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. नव्या वर्षाचं स्वागत आणि सुट्टी साजरी करण्यासाठी हे लोक जमले होते. कोणत्याही प्रकारचा हल्ला कोणत्याही समुदायावर आम्ही सहन करणार नाही अशा शब्दात ज्यो बायडेन यांनी इशारा दिला आहे.

एफबीआयकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आज (दि.१) सकाळी न्यू ऑरलियन्समध्ये बॉर्बन स्टीरटवर एकाने गर्दीत ट्रक घुसवला. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर ३० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. एफबीआय या हल्ल्याचा तपास करत असून सहकाऱ्यांसोबत मिळून या दहशतवादी कृत्याची चौकशी करत असल्याचंही एफबीआयने म्हटले आहे.