डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यांनी सोमवारी रात्री भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता अमेरिकन संसद कॅपिटल हिल येथे पदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी त्यांना शपथ दिली. ट्रम्प यांची ही राष्ट्राध्यक्ष होण्याची दुसरी वेळ आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सुमारे २०० कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेत ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर स्थलांतरितासंबंधी कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
अमेरिका फर्स्ट या धोरणानुसार काम करणार असून अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर यावेळी केले. यापुढे जगातले सर्वात बलवान लष्कर म्हणून अमेरिकेच्या लष्कराची बांधणी करणार, तसेच मेक्सिकोच्या सीमेवर नॅशनल इमर्जन्सी जाहीर करणार अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. तसेच देशातील ड्रग्ज तस्करांना दहशतवादी घोषित करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
ड्रग्ज तस्करांना दहशतवादी घोषित करणार
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी हद्दपारी मोहीम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. जेणेकरून देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात येणार आहे. ट्रम्प ड्रग कार्टेल संस्थांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी देखील पावले उचलू शकतात. स्थलांतरित सुरक्षा प्रोटोकॉल धोरणाची थेट पुनर्स्थापना होऊ शकते.
चीन, कॅनडाच्या वस्तुंवर आयात शुल्क लावणार
सर्वांचे लक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाकडे असेल. कारण मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर २५ टक्के शुल्क लागू करणार असल्याचं ट्रम्प यांनी या आधीच जाहीर केलं आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर आधीच लादलेल्या शुल्कामध्ये ट्रम्प यांना १० टक्के शुल्क जोडायचे आहे. जीवाश्म इंधन प्रकल्पांसाठी नियम लवचिक केले जाऊ शकतात.