अमेरिकेच्या वायुसेनेच्या C-17 ग्लोबमास्टर III विमानाने आज सकाळी श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २०५ भारतीय नागरिकांना आणले. हे नागरिक अमेरिकेत अवैधपणे राहत होते. अमेरिकेने भारतीय नागरिकांना परत पाठवण्यासाठी लष्करी विमानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विमानात एकूण ३० हद्दपार केलेले नागरिक पंजाबचे रहिवासी होते. याशिवाय, हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी ३३ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश प्रत्येकी तीन आणि चंडीगडचे दोन नागरिक होते.
गेल्या तीन वर्षांत भारतीय नागरिकांच्या हद्दपारीत ४००% वाढ झाली आहे. नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणांमुळे आता अमेरिकेत अधिकृतपणे राहणाऱ्यांना परत पाठवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. C-17 ग्लोबमास्टर III विमान मुख्यतः लष्करी, मानवतावादी आणि शांतता मोहिमांसाठी वापरले जाते. ते पहिल्यांदाच अशा गोष्टींसाठी वापरण्यात आले. हे विमान टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून निघाले आणि जर्मनीतील रामस्टीन एअर बेसवर इंधन भरल्यानंतरअमृतसरमध्ये सकाळी ९ वाजता पोहोचले.
'जे नागरिक परदेशात अवैधपणे राहत आहेत त्यांच्या कायदेशीर परत येण्यास भारत नेहमीच तयार आहे.', अशी भूमिका परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी घेतली होती. अमेरिकन सरकारच्या या भूमिकेमुळे अवैधपणे राहणाऱ्या हजारो भारतीय नागरिकांवर डीपोर्टेशनची टांगती तलवार लटकली आहे. प्यू रिसर्च सेंटरनुसार, अमेरिकेत सुमारे सात लाख २५ हजार अवैध भारतीय स्थलांतरित वास्तव्यास आहेत. त्यामुळे भविष्यात संभाव्य हद्दपारीचे प्रमाण मोठे असू शकते. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध यांवर स्थलांतर धोरण कितपत प्रभाव टाकते हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्याआधी हे घडले आहे. या भेटीत ट्रम्प यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात अलीकडेच चर्चा झाली होती, ज्यात त्यांनी जागतिक शांतता आणि सुरक्षिततेच्या इतर विषयांसह स्थलांतरावरही चर्चा केली होती. "मोदींबरोबर स्थलांतरावर चर्चा झाली. अवैध स्थलांतरितांना परत घेण्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते भारत करेल," असे ट्रम्प यांनी याबद्दल म्हटले होते.
भारताने अमेरिकेला आश्वासन दिले होते की ते अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या स्थलांतरितांना परत घेऊन सहकार्य करेल. MEAचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की, "आम्ही अवैध स्थलांतराच्या विरोधात आहोत. कारण ते संघटित गुन्हेगारीच्या अनेक प्रकारांशी जोडलेले आहे."
ते पुढे म्हणाले होते की, "फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगात कुठेही भारतीय नागरिक असतील आणि ते योग्य कागदपत्रांशिवाय एखाद्या विशिष्ट देशात असतील, तर आम्ही त्यांना परत घेऊ. मात्र आमच्यासोबत त्यांची माहिती शेअर केली जावी जेणेकरून आम्ही त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पडताळू शकू आणि ते खरोखरच भारतीय आहेत का हे तपासू. आमच्या पडताळणीत जर ते भारतीय असल्याचे आढळले तर आम्ही त्यांच्या भारतात परतण्याची व्यवस्था करू." असेही ते म्हणाले होते.