देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेले हिंदू नेते चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्यासह ‘इस्कॉन’शी संबंधित १७ जणांची बँक खाती बांगलादेश सरकारने आज तीस दिवसांसाठी गोठवली आहेत. ‘इस्कॉन’वर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर सरकारने सूडबुद्धीने कृष्णदास यांच्यावर कारवाई सुरू असल्याचा आरोप धार्मिक अल्पसंख्य हिंदू समुदायाने केला आहे. दरम्यान, कृष्णदास यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी आजही बांगलादेशात अनेक ठिकाणी आंदोलन झाले.
‘इस्कॉन’ ही कट्टरतावादी संघटना असल्याने त्यांच्यावर बंदी घालावी, ही बांगलादेश सरकारने केलेली मागणी फेटाळतानाच उच्च न्यायालयाने पुरावे सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यापार्श्वभूमीवर ‘इस्कॉन’शी संबंधित लोकांची बँक खाती गोठविण्याची कारवाई केल्याचा दावा केला जात आहे. बांगलादेशमधील आर्थिक गुप्तचर विभागाने आज देशभरातील विविध बँकांना आणि वित्त संस्थांना सूचना देत कृष्णदास आणि इतर १६ जणांच्या बँक खात्यावरील सर्व व्यवहार ३० दिवसांसाठी गोठविण्यास सांगितले. तसेच, या खात्यांवरून नजीकच्या काळात झालेल्या व्यवहारांची माहितीही सरकारला कळविण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
ढाक्यात प्रार्थनेनंतर निदर्शने
न्यायालयाने नकार दिल्यानंतरही बांगलादेशात ‘इस्कॉन’वर बंदी घालण्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर राजधानी ढाक्यात मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्यात आले. बहुतांश निदर्शक हिफाजते इस्लाम या संघटनेशी संबंधित होते.
भारताचे धोरण दुटप्पी : बांगलादेश
अल्पसंख्याक समुदायांना संरक्षण देण्याच्या मुद्द्यावर भारताची वागणूक दुटप्पीपणाची असल्याची टीका बांगलादेश सरकारने केली आहे. तसेच, भारतातील प्रसारमाध्यमांवरही टीका करताना, बांगलादेशविरोधात चुकीची माहिती पसरविण्याची मोहीमच सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
भारताने बांगलादेशातील अल्पसंख्याकांबाबत व्यक्त केलेली चिंता अनावश्यक असल्याचे सांगत कायदा मंत्री असिफ नाझरुल म्हणाले,‘‘भारतात अल्पसंख्य मुस्लिम समुदायावर अत्याचाराच्या प्रचंड घटना घडत आहेत. त्याबद्दल त्यांना वाईट वाटत नाही. बांगलादेशमधील घटनांबाबत मात्र आगपाखड केली जाते. भारताची ही वागणूक दुटप्पीपणाची आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांना संरक्षण आहे, असे बहुसंख्य नागरिकांचे मत आहे.
भारतातील प्रसार माध्यमे बांगलादेशमधील घटनांबाबत अत्यंत चुकीचे वार्तांकन करत असल्याची टीकाही नाझरुल यांनी केली. दरम्यान, बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनीही, सत्यकथन करून भारतीय माध्यमांकडून होत असलेल्या अपप्रचाराला उत्तर द्यावे, असे आवाहन बांगलादेशमधील पत्रकारांना केले आहे.