शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात... या भव्य संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील ७५ देशात साजरी करण्यात येते. युरोपातील नेदर्लंड्स येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच, नेदर्लंड्स आणि सत्यशोधक, नेदर्लंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती, मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शिव - स्वराज्य विचारांचा जागर झाला.
नेदर्लंड्स येथील शिवजयंतीसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ऑनलाईन उपस्थित होते. शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करुन आणि जिजाऊ वंदना, महाराष्ट्र गीत गायनाने झाली. बेल्जियमचे प्रदीप बनसोड यांनी 'पुरोगामी महाराष्ट्र' या विषयावर अतिशय सखोलपणे मांडणी केली. यामध्ये त्यांनी हडप्पा, मोहेंजदरो पासून भारतीय कसे सुधारणावादी होते, हे सर्वाना पटवून दिले.
कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी शिवचरित्र व संबंधित विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जे लोक शिवाजी महाराज व महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन जीवन जगतात, ते अतिशय समृद्ध असं जीवन जगत असतात. शिवचरित्र जर समजून घ्यायचं असेल तर अगोदर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं लागेल.
महापुरुषांच्या नावाखाली बरेच लोक विविध अंधश्रद्धा पसरवत असतात, त्यापासून सर्वांनी दूर राहण्याचं आवाहन त्यांनी केले. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम समुद्र उल्लंघन करून बसनूर वर स्वारी केली व भारताच्या आरमार दलाचा पाया रोवला, असे प्रतिपादन त्यांनी केले. राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा युरोप दौरा केला व युरोपातील विविध देशांचा त्यांनी अभ्यास केल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच इटालीमध्ये छत्रपती राजाराम यांचं स्मारक असून त्या स्मारकाला आपण भेट द्यावी असं आवाहन केलं. पुढे त्यांनी शिवाजी महाराज आणि डच संबंदावर विशेष प्रकाश टाकला. पन्हाळ्याच्या पायथ्याला बलिदान देणारे शिवाजी काशीद यांची माहिती इतिहासातील डच कागद पत्रांमुळे प्रकाशात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना इंद्रजित सावंत सरांनी समर्पक अशी उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बाल शिवप्रेमींनी 'मी मराठी' या गाण्यावर नृत्य अविष्कार सादर करून वातावरण भारावून टाकले. त्यानंतर इतर बाल शिवप्रेमींनी 'अनिवासी भारतीय आणि त्यांचे भारताच्या विकासामध्ये योगदान', 'नेदरलँड मधील जीवन पद्धती' याबद्दल महत्वाची माहिती सादर केली. या शिवजयंतीमध्ये बाल शिवप्रेमींचा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सहभाग उल्लेखनीय होता ज्यामध्ये गायन, शिवरायांचा इतिहास, शिव गर्जना इत्यादींचा समावेश होता.
त्यानंतर रामेश्वर कोहकडे यांनी 'शिवचरित्र आणि शिवचरित्रातून आपण काय शिकावे' या विषयावर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कोचळे यांनी केले. कार्यक्रमस्थळी शिवरायांच्या गडकिल्यांची तसेच विविध इतिहासातील प्रसंगांची भित्तीपत्रके लावण्यात आली होती.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन भोसले, संतोष सावंत, पंकज थूल, रेश्मा कोचळे, मनीषा भोसले , प्रदीप लबदे, ज्ञानेश्वर घायाळ व रामेश्वर कोहकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच दुबईहुन राजेश पाटील, विक्रम भोसले, आशिष जिवणे व इतरांचे विशेष सहकार्य मिळाले.
नेदर्लंड्स येथे १ ल्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी - युरोपमधील बेल्जियम, जर्मनी या देशांतून आणि नेदर्लंड्सच्या विविध प्रांतातून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.