बीजिंग: विशेष प्रतिनिधी पातळीवरील चर्चेदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांचे बुधवारी स्वागत करताना चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी.
पूर्व लडाखमधील वादानंतर चार वर्षांपासून गोठलेल्या द्विपक्षीय संबंधांना पुन्हा चालना मिळावी यासाठी भारत आणि चीनने एक पाऊल पुढे टाकले असून आज दोन्ही देशांदरम्यान विशेष प्रतिनिधी पातळीवरील चर्चेला सुरुवात झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांदरम्यान आज चर्चा होऊन सहा मुद्द्यांवर एकमत झाले. सीमावादावर परस्परांना मान्य होईल असा तोडगा निघावा, अशी अपेक्षा भारताने यावेळी व्यक्त केली.
भारत आणि चीनदरम्यान विशेष प्रतिनिधी पातळीवरील चर्चेची ही २३ वी फेरी आहे. मात्र, आजची ही चर्चा २०१९ मध्ये दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर पाच वर्षांच्या खंडानंतर आयोजित करण्यात आली आहे. चर्चेच्या या फेरीमध्ये दोवाल आणि वँग यी यांनी सीमावादासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. ताबा रेषेवर शांतता कायम राखणे आणि संबंधांमध्ये विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, यासह सहा मुद्द्यांवर दोन्ही देशांचे एकमत झाले.
चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी सीमावादाबाबत निश्चित केलेल्या तोडग्यांचे मूल्यमापन केले. तसेच, २१ ऑक्टोबरला दोन्ही देशांदरम्यान सैन्यमाघारीबाबत आणि सीमेवरील गस्तीबाबत करार झाला होता, त्याची अंमलबजावणी कायम ठेवण्यावरही एकमत व्यक्त केले. सीमावादाचा विषय संयमाने आणि योग्य पद्धतीने हाताळणे आवश्यक असून त्याचा द्विपक्षीय संबंधावर परिणाम होता कामा नये, असेही यावेळी ठरविण्यात आले. कायमस्वरुपी तोडग्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणे, सीमेवरील नियंत्रणाबाबत अधिक स्पष्ट धोरण आखणे, विश्वासार्हता वाढविणे आणि सीमाभागात शांतता कायम राखणे हे मुद्देही मान्य करण्यात आले.