वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन निखत जरीन बनली डीएसपी

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
डीएसपी निखत जरीन
डीएसपी निखत जरीन

 

प्रज्ञा शिंदे
 
‘मुलगी खेळणार? त्यातही बॉक्सिंग. मुलांचे खेळ खेळणार!  डोळ्यावर ठोसा बसला, चेहऱ्याचं रंगरुप बदललं तर लग्न कोण करणार पोरीशी?’ असं निखत जरीनच्या आईवडिलांना सांगायलाही नातेवाईकांनी कमी केलं नाही. मात्र ‘लेक चॅम्पिअन खेळाडू व्हावी.’ असं स्वप्न वडिलांनी मनाशी बाळगलं आणि लेकीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले.

एकदा निखतच्या डोळ्याला पंच बसला, डोळा काळानिळा झाला, आई वैतागून म्हणाली, “ लग्न कसं होणार? चेहरा असा बिघडला तर?”  त्यावर वडील म्हणाले, “थांब, एक दिवस लेकीच्या कौतुकासाठी रांगा लागतील आपल्या घराबाहेर” आणि आज तसचं घडत आहे निखतच्या आयुष्यात... सगळीकडे तिचे कौतुक होत आहे.

डीएसपी निखत 
निखत जरीन १८  सप्टेंबर २०२४ ला तेलंगणा पोलिसात पोलिस उपअधीक्षक म्हणून रुजू झाली. यानंतर, तिने डीजीपी कार्यालयात ड्युटीसाठी अहवाल दिला. महेश एम भागवत आयपीएस, अतिरिक्त डीजीपी (कायदा व सुव्यवस्था प्रभारी कर्मचारी), यांनी निखत जरीनचे तिच्या नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन केले.

 
कोण आहे निखत जरीन
निखतचा जन्म १४ जून १९९६ रोजी तेलंगणामधील निजामाबाद येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव मुहम्मद जमील अहमद आणि आईचे नाव परवीन सुलताना आहे. निखत जरीनचे वडील, एक क्रिकेटर, त्यांना त्यांच्या चार मुलांपैकी प्रत्येकाने कोणता ना कोणता खेळ खेळावा आणि त्यांच्या तिसऱ्या मुलीने बॉक्सिंग निवडावे अशी इच्छा होती. जेव्हा निखत लहान होती, तेव्हा ती तिच्या वडिलांसोबत बॉक्सिंग रिंगमध्ये गेली होती आणि तिने फक्त पुरुष सहभागी पाहिले आणि तिला आश्चर्य वाटले की हा खेळ फक्त पुरुषांसाठी आहे का? तेव्हा तिच्या वडिलांनी तिला आश्वासन दिले की महिलाही बॉक्सिंग करू शकतात. मग मात्र तिने भारतासाठी चॅम्पियन होण्याचा निर्धार केला. जरीनचे नातेवाईक तिच्या खेळण्याला विरोध करत होते परंतु तिचे वडील आणि काकांनी तिला स्वतःवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित केले. तिने इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथे प्रशिक्षक रॉन सिम्स यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

अगदी लहान वयात, ती स्प्रिंट स्पर्धांमध्ये राज्य चॅम्पियन म्हणून उदयास आली. वयाच्या १४ व्या वर्षी जरीनला वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनचा मुकुट मिळवला. २०१७मध्ये, खांद्याच्या दुखापतीमुळे तिचे संपूर्ण वर्ष हुकले, परंतु पाच वर्षांनी ती धमाकेदारपणे परतली. 

तिचे वडील मोहम्मद जमील यांनी एकदा इंडियन एक्स्प्रेसला सांगितले होते, "जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणे ही अशी गोष्ट आहे, जी मुस्लिम मुलींसाठी तसेच देशातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरेल. आयुष्यात मोठे यश मिळवण्याचे उद्दिष्ट ही मुख्य गोष्ट आहे, मग तो मुलगा असो वा मुलगी, त्यांना स्वत:चा मार्ग स्वत:च बनवावा लागतो आणि निखतने स्वत:चा मार्ग मोकळा केला आहे."

 
निखत जरीनने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली आहेत, एक इस्तंबूल २०२२ मध्ये आणि दुसरे नवी दिल्ली २०२३मध्ये. तिने बर्मिंगहॅममध्ये २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्ण जिंकले. आशियाई खेळ २०२३ मध्ये जरीनने कांस्यपदक जिंकले. तिला २०२२मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अशी ही निखत दोन वेळा विश्व बॉक्सिंग चॅम्पियन आहे. नुकतेच तिने तेलंगणा पोलिसमध्ये पोलीस उपअधीक्षक(डीएसपी) पदाचा पदभार स्वीकारला केला आहे. तिच्या कामगिरीची दखल घेऊन राज्य सरकारने तिची ही नियुक्ती केली आहे.

"आम्ही दोन वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन आणि ऑलिम्पिक ऍथलीट, निखत झरीनचे पोलिस उपअधीक्षक, म्हणून नवीन भूमिका स्वीकारत असताना तिचे अभिमानाने स्वागत करतो," असे  म्हणत पोलीस महासंचालक डॉ. जितेंद्र यांनी तिचे जोईनिंग लेटर स्वीकारले आहे.

 
कसा होता निखतचा प्रवास  
वयाच्या तेराव्या वर्षीच निखतने बॉक्सिंगच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. जागतिक बॉक्सिंग सोबतच तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकही जिंकले आहे. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकही तिच्या नावावर आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी ती वर्ल्ड युथ चॅम्पियन झाली. तिला उत्तम प्रशिक्षणही मिळालं. उत्तम काेचही लाभले. 

निखतचे काका ही बॉक्सर आहेत. त्यांची मुले इथेशामुद्दीन आणि इमीशामुद्दीन दोघे ही बॉक्सर. निजामाबादच्या या कुटुंबाला खेळाचे वेड होते. पण तेलंगणातल्या छोट्या शहरात मुलांनी खेळण्याला हरकत नव्हती, पण मुलींच्या खेळाचं मात्र भवताली सर्वांनाच वावडं होतं. त्यात मुलगी घराबाहेर खेळायला जाते हे तर फारच खटकणारे होते. वडील मात्र निखतच्या मागे उभे राहिले आणि त्यामुळेच निखत वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन झाली.

 
२०२३ मध्ये, निखतने दिल्ली येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आपले विजेतेपद कायम ठेवले. मेरी कोमनंतर हे विजेतेपद दोनदा जिंकणारी ती दुसरी भारतीय बॉक्सर ठरली. पॅरिस ऑलिम्पिक-२०२४ मध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला निखत जरीनकडून पदकाची अपेक्षा होती. पण जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या निखतला ऑलिम्पिकच्या सोळाव्या फेरीतून बाहेर पडावे लागले. "माफ करा मित्रांनो, मी देशासाठी पदक जिंकू शकले नाही." असे म्हणून निखतने खंत सुद्धा व्यक्त केली होती. 

खेळात हार - जीत ठरलेलीच आहे मात्र, निखत कधी हरलेली नाही असेच म्हणावं लागेल.निखत ही एकटीच तेलंगणातून मुस्लिम मुलगी बॉक्सर होती, निखतनंतर आता १०० हून अधिक मुस्लिम मुली बॉक्सर आहेत. 

निखतच्या यशाचा चढता आलेख 
निखतने २०११ मध्ये महिला ज्युनियर युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली. २०१४ युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले. २०१४ मध्ये नेशन्स कप आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा जिंकली. २०१५ मध्ये वरिष्ठ महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली. २०१९ मध्ये थायलंड ओपनमध्ये रौप्य आणि स्ट्रान्झा बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २०२२ स्ट्रेंझा बॉक्सिंग स्पर्धा आणि महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २०२३ महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. 

मेरी कोम आणि निखत 
प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोमसोबत बॉक्सिंगच्या रिंगणात अनेकवेळा निखतने दोन हात केलेआहेत. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने मेरीकोमला टोकिय ऑलिंपिकसाठी ट्रायल शिवाय ५१ किलो स्पर्धेसाठी निवडले होते. तेव्हा संघटनेचे चेअरमन राजेश भंडारी यांनी निखतला भविष्यासाठी तयार करत असल्याचे म्हटले होते. याविरुद्ध निखतने आवाज उठवला होता आणि थेट क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना पत्र लिहले होते. या सर्व वादानंतर मेरीकोमचे ट्रायल झाले होते. ही ट्रायल निखतविरुद्ध झाली, ज्यात मेरीकोमने विजय मिळवला होता. टोकिय ऑलिंपिकसाठी निखतने जेव्हा ट्रायलची मागणी केली होती, तेव्हा मेरीकोमने पत्रकारांसमोर “कोण आहे निखत जरीन?” असा प्रश्न केला होता. आता सुवर्णपदक मिळवल्यानंतर निखतने मेरीला आपल्या यशातून उत्तर दिले होते आणि स्वतःला सिद्ध केले होते.

 
निखत बनली प्रेरणास्थान 
निखत जरीनची डीएसपी म्हणून नियुक्ती ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नाही तर अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तेलंगणातील एका छोट्याशा शहरापासून विश्वविजेता आणि आता डीएसपी बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास ही चिकाटी, मेहनत आणि समर्पणाची कथा आहे.

आपली स्वप्न साकार होऊ शकतात, आपण मोठी झेप घेऊ शकतो! हा विश्वास लाखो मुलींमध्ये निखतने निर्माण केला आहे. ज्या समाज्यात मुलींच्या खेळण्यालाच नाही तर स्वप्नांनाही अजून दुय्यम स्थान आहे तिथं निखतचं हे यश फार महत्त्वाचे ठरते.

 
तिच्या याच यशामुळेच तिला तेलंगणा सरकारने डीएसपी पदावर नियुक्त केले आहे. निखतच्या या संपूर्ण यशस्वी प्रवासाला सलाम आणि तिच्याहातून उत्तम देशसेवा होवो यासाठी आवाज मराठीकडून शुभेच्छा !

 

-प्रज्ञा शिंदे

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter