पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात दरम्यान महिलांसाठी एक घोषणा केली आहे. ८ मार्च रोजी राष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक दिवसासाठी पंतप्रधान मोदींचे सोशल मीडिया अकाउंट महिलांकडे सोपवण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदींनी ८ मार्च २०२० रोजी अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील सात आघाडीच्या महिलांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सुपूर्द केले होते.
रविवारी झालेल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विविध क्षेत्रांतील महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "महिलांच्या अदम्य आत्म्याचा उत्सव साजरा करूया आणि त्यांचा आदर करूया." राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त संशोधन प्रयोगशाळा आणि तारांगणांना भेट देऊन 'एक दिवस शास्त्रज्ञ म्हणून प्रयत्न करा' असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी लोकांना केले.
‘देश निरोगी व्हावा’
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी लोकांना लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येवर उपाययोजना करण्याचे आवाहन केले. ते म्हटले की, "भारत एक तंदुरुस्त आणि निरोगी देश बनणे आवश्यक आहे.आठपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त असून, गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या दुप्पट झाली आहे. सर्वांत चिंताजनक गोष्ट म्हणजे मुलांमध्ये हे प्रमाण चौपट झाले आहे."
ते पुढे म्हणाले, "जेवणात तेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करावा. मी हे आवाहन १० जणांना करीत असून, अशीच विनंती प्रत्येकाने १० जणांना करावी." तसेच लोकांना लठ्ठपणा कमी करण्यास किंवा तो रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रासह काही व्यक्तींचे ‘ऑडिओ’ संदेश ऐकवले.