आरती सरीन बनल्या AFMC च्या पहिल्या महिला महानिर्देशक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
आरती सरीन
आरती सरीन

 

भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेत नुकताय एक ऐतिहासिक घटना घडली आहे. सर्जन व्हाइस अॅडमिरल आरती सरीन यांनी सशस्त्र दल वैद्यकीय सेवा अर्थात AFMC च्या महानिर्देशक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आरती सरीन या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंगळवारी त्यांनी औपचारिकरित्या पदाचा कार्यभार स्वीकारला, आणि यासह भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवांमध्ये महिलांच्या नेतृत्वासाठी नवा अध्याय सुरू झाला आहे.

३८ वर्षांची प्रदीर्घ सेवा
रक्षा मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, सरीन यांनी 46 व्या DGAFMS पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी DG वैद्यकीय सेवा (नौदल), DG वैद्यकीय सेवा (वायुदल), आणि सशस्त्र बल वैद्यकीय महाविद्यालय (AFMC) पुणेच्या संचालक आणि कमांडंट पदांवर काम केलं आहे. त्यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी सशस्त्र दलाच्या विविध वैद्यकीय धोरणांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

सरीन या AFMC च्या माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी AFMC मधून रेडियोडायग्नोसिसमध्ये MD पदवी मिळवली आहे. याशिवाय, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथून रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये डिप्लोमेट नॅशनल बोर्डची पदवीही मिळवली आहे. त्यांनी पिट्सबर्ग विद्यापीठातून गामा नाइफ सर्जरीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले आहे, ज्यामुळे त्यांचे वैद्यकीय कौशल्य आणखी दृढ झाले आहे.

भारतीय वायुसेनेत एअर मार्शल
३८ वर्षांच्या आपल्या सेवेत सरीन यांनी अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक आणि प्रशासकीय पदांवर काम केले आहे. त्यांनी आर्मी हॉस्पिटल (R&R), कमांड हॉस्पिटल (दक्षिणी कमान)/AFMC पुणे येथे प्राध्यापक आणि डीन या पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी INHS अश्विनीच्या कमांडिंग ऑफिसर पदावर कार्य केले आहे, तसेच भारतीय नौदलाच्या दक्षिणी आणि पश्चिमी नौदल कमानमध्ये कमांड मेडिकल ऑफिसर पदावरही काम केले आहे.

भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांमध्ये सेवा बजावण्याचा मान त्यांना मिळाला आहे. भारतीय सेनेत लेफ्टनंटपासून कॅप्टनपर्यंत, भारतीय नौसेनेत सर्जन लेफ्टनंटपासून सर्जन व्हाइस अ‍ॅडमिरलपर्यंत, आणि भारतीय वायुसेनेत एअर मार्शल म्हणून सेवा बजावली आहे. रुग्णांच्या काळजीसाठी त्यांनी दाखवलेली निष्ठा आणि आदर याबद्दल २०२४ मध्ये अती विशेष सेवा पदक आणि २०२१ मध्ये विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आलं आहे.