कारीगर हायस्कूलच्या मुस्लिम विद्यार्थिनींच्या यशाने पूर्वग्रहांना दिला पुर्णविराम!

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 13 d ago
कारीगर हायस्कूलच्या यशस्वी मुली आणि मार्गदर्शक
कारीगर हायस्कूलच्या यशस्वी मुली आणि मार्गदर्शक

 

प्रज्ञा शिंदे

मुस्लिम महिलांचा उल्लेख होताच आपल्या मनात अनेक पूर्वग्रह उभे राहतात. मुस्लिम महिलांचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी असते, त्यांना शिक्षणाच्या संधी मर्यादित असतात आणि क्रीडा क्षेत्रात तर त्यांचा मुळीच सहभागच नसतो असे गैरसमजही आपल्याकडे बऱ्यापैकी प्रचलित आहेत. मात्र, या सर्व पूर्वग्रहांना सोलापूरच्या बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूलच्या मुलींनी आपल्या कर्तृत्वाने, जिद्दीने आणि धाडसाने  उत्तर दिले आहे.

 

या मुलींनी दाखवून दिले आहे की, घराबाहेर पाऊल टाकण्याची आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता प्रत्येक मुलीत असते, मग ती कोणत्याही धर्माची का असेना! क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपले कौशल्य दाखवून, मुस्लिम महिलांच्या सहभागाच्या संधी किती मोठ्या प्रमाणात आहेत हे सिद्ध केले आहे.  आपल्या कर्तृत्वाने त्यांनी शाळेचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.

 

जिल्हा क्रीडा परिषद व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने काही दिवसांपूर्वी  शालेय शहरस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात बेगम कमरुन्निसा कारीगर हायस्कूलच्या संघाने पहिला क्रमांक पटकावला आहे.  या संघात शाहजिया दारूवाले, फिरदौस शेख, अजल्फा दारूवाले, सादिया हवालदार, आयशा कमिशनर या खेळाडूंचा समावेश होता. 

 

या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षिका सईदा दारूवाले, अनिसा नालबंद, वसीम बागवान, शहनाज शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय कर्तबगारीमुळे प्राचार्या तहसीना शेख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अशा सर्वांच्याच आनंदाला पारावार उरलेला नाही. 

 

या मुस्लीम विद्यार्थिनींच्या घवघवीत यशाचे गमक जाणून घेण्यासाठी आवाज मराठीच्या प्रतिनिधींनी क्रीडा शिक्षिका सईदा दारूवाले यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी झालेल्या संवादातून अनेक पूर्वग्रहांना पूर्णविराम लावणाऱ्या आश्वासक गोष्टी समोर आल्या. सईदा यांनी सांगितले कि, "आमच्या हायस्कूलमध्ये मुली केवळ टेबल टेनिसच नव्हे तर नेटबॉल, वॉलीबॉल, शूटिंगबॉल, बास्केटबॉल यांचेही प्रशिक्षण घेतात आणि त्यात प्राविण्य मिळवतात.”

 

त्या पुढे सांगतात,“आमच्या अनेक मुलींनी विविध खेळांमध्ये पारितोषिकेही  मिळवली आहेत. मैदानातील या यशाचा  सकारात्मक परिणाम त्यांच्या अभ्यासातही दिसतो. आमच्या अनेक खेळाडू मुलींनी १० वीच्या परीक्षेतही उत्तम मार्क्स मिळवले आहेत.” 

 

खेळाचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुस्लीम मुलींच्या कुटुंबियांकडून या मुलींना मोठे प्रोत्साहन मिळते त्याविषयी सईदा म्हणतात, “अनेकांना असं वाटतं की मुस्लीम मुलींचे पालक शिक्षणाला आणि खेळाला विरोध करत असतील. मात्र चित्र त्याहून अगदी उलट आहे. आमच्या शाळेतील मुलींचे पालक मुलींना फक्त खेळण्याची परवानगीच देतात असे नाही, तर अतिरिक्त सरावावेळी बरेचदा पालक स्वतः ग्राउंडवर येऊन मुलींचा सरावासाठी होईपर्यंत थांबतात. आपल्या मुलींना प्रोत्साहन देतात. कुटुंबाच्या सहकार्य आणि सहभागामुळेच मुलींना अधिकच प्रेरणा मिळते.. ”

 

मुस्लीम मुली आणि बुरखा हे समीकरणही बऱ्यापैकी रूढ झाले आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की बुरखा घालून या मुली खेळत कशा असाव्यात. त्याविषयी माहिती देताना क्रीडा शिक्षक सईदा पुढे सांगता, “अनेक मुस्लीम महिला आणि मुली बुरखा, हिजाब असा पेहराव करतात. साहजिकच बुरखा परिधान करून खेळाचा सराव करणे बरेचदा शक्य नसते. त्यामुळे मुली सराव करताना बुरखा खालून सराव नाही करत. मात्र सराव झाल्यावर बुरखा किंवा हिजाब घालणाऱ्या मुली तो परिधान करतात.”

 

शाळेतील टेबलटेनिसच्या ट्रेनिंगबद्दल माहिती देताना सईदा सांगताना, “आम्ही खेळाडूंचा नियमितपणे सराव घेतो.  टेबल टेनिसशी संबंधित उच्च दर्जाची साधने आमच्याकडे उपलब्ध आहेत. सरावाच्यावेळी प्रशिक्षक या नात्याने खेळाडूंच्या कामगिरीवर माझी बारीक नजर असते. त्यामुळे गरज असेल तिथे आम्ही मार्गदर्शन करतो. सरावामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याकडे आमचे कटाक्षाने लक्ष असते. त्यामुळे शक्यतो सरावाची वेळ शाळा सुटल्यानंतरची असते.”  

 

स्पर्धेत चमकलेली  शाहजिया दारूवाले या विद्यार्थिनीशी संवाद साधला असता तिने सांगितले कि, ती केवळ टेबल टेनिसच नव्हे तर नेटबॉल आणि बास्केटबॉलही खेळते.  तीन वर्षांपासून ती या खेळांचा सराव करत आहे.  खेळ आणि शारीरिक व्यायामाने शरीरतर निरोगी राहतेच त्याचबरोबर मनही प्रसन्न राहते. 

 

कुटुंबाकडून मिळत असलेल्या सहकार्याविषयी ती म्हणते, “मी या खेळांचा सराव करत राहावा म्हणून घरचे मला कायमच प्रोत्साहन देतात. माझी आत्याही क्रीडा शिक्षिका असल्यामुळे मला तिचेही मोलाचे मार्गदर्शन मिळते.”

 

शाहजिया खेळासोबतच अभ्यासातही हुशार आहे. ती सध्या नीट मेडिकल परीक्षेची तयारी करत आहे. भविष्यात तिला डॉक्टर व्हायचे आहे. पण सोबतच  नेटबॉल आणि बास्केटबॉल चा सराव सुरूच ठेवून विविध स्पर्धांमध्ये भागही घेणार असल्याचे ती आवर्जून सांगते. 

 

विजेत्या खेळाडूंमध्ये फिरदौस शेखचाही समावेश आहे. ‘आवाज’शी बोलताना ती म्हणते,  "टेबलटेनिस बरोबरच मी वॉली बॉल, शूटिंगबॉल आणि बास्केटबॉलही खेळते. त्यासाठी  पालकांचे  सहकार्य फार प्रेरणा देते. सोबतच आमची हायस्कूल आणि क्रीडा शिक्षिका सादिया मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते. त्यांच्यामुळेच आम्ही हे विजेतेपद मिळवू शकलो.."

 

अकरावीत शिकणाऱ्या फिरदौसला भविष्यात पोलीस अधिकारी व्हायचं आहे. त्याचीही ती तयारी करत आहे. अभ्यासाला पुरेसा वेळ देऊन ती रोज न चुकता तासभर सरावही करते.

 

या कर्तबगार मुली केवळ मुस्लीम समाजासाठीच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी प्रेरणा बनल्या आहे. कौतुकाची बाब म्हणजे खेळासोबतच शिक्षणातही सर्वोच्च शिखर गाठण्याची त्यांची विजिगीषू वृत्तीने हे दाखवून दिले आहे की  महिला विशेषतः मुस्लीम महिलाही मोठी स्वप्न बाळगून आहेत. योग्य संधी आणि कुटुंबाचे सहकार्य मिळाल्यास कोणतेही ध्येय त्यांच्यासाठी छोटे नाही. सोलापूरच्या बेगम कमरुन्निसा कारीगर हायस्कूलच्या या मुलींना ‘आवाज मराठी’कडून हार्दिक शुभेच्छा!

 

-प्रज्ञा शिंदे

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter