डॉ. वृषाली शेख
नवरात्रोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांत दुर्गेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. व्रत-वैकल्ये केली जातात. महिलांच्या शौर्याची आणि धैर्याची अनेक उदाहरणे आपल्याला भारतीय संस्कृतीत मिळतात. वर्तमानकाळातही वेगवेगळ्या क्षेत्रांत शौर्य गाजवणाऱ्या असंख्य कर्तुत्वत्वान महिलांनी क्षितीज व्यापलेले आहे. या नवरात्रामध्ये 'आवाज मराठी'वरून अशाच काही कर्तुत्ववान मुस्लीम महिलांची ओळख करून दिली जाणार आहे. आपल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या अशाच एका महिलेच्या कार्याची ओळख करून देणारा हा विशेष लेख.
आनंद हा जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा
झिजून स्वतःच चंदनापरी दुसऱ्यास मधुगंध द्यावा
प्रा. राजेश निकम यांच्या या कवितेल्या ओळींप्रमाणेच एका अंध तरुणीची कहाणी आहे. नाशिक येथील या तरुणीची लढाई आदर्शवत् तर आहेच; पण प्रेरणादायीही आहे. संगीत, कला, कविता, शिक्षण, समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या या तरुणीला भविष्यात सामाजिक क्रांतीसाठी झोकून द्यायचे आहे. गेल्या काही वर्षांत विविध उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न ती करत आहे. आयुष्यातील संकटांची मालिका भेदून स्वतःचे कुटुंब सावरत तिने सामाजिक कार्याचा ठसा उमटवलाय. या तरुणीचं नाव आहे डॉ. वृषाली शेख. तिचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती देशातील पहिली अंध रेडिओ-जॉकी आहे. प्रत्यक्ष भेटीत तिचा हा सगळा प्रवास जाणून घेता आला, त्याविषयी...
वृषाली ही नाशिक येथील लेखापरीक्षक मधुकर गुजराथी यांची मुलगी. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत तिची दृष्टी इतर सर्वसामान्यांसारखीच होती. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी ती डोळ्यांनी व्यवस्थित पाहू शकत असे. त्यांचा आनंद उपभोगू शकत असे; पण बाराव्या वर्षानंतर हळूहळू दिसणे कमी होऊ लागले आणि सोळाव्या वर्षापर्यंत तिला पूर्ण अंधत्व आले.
ज्या डोळ्यांनी आजवर अनेक रंग पाहिले त्याच डोळ्यांसमोर दाटलेला अंधकार वृषालीला उद्ध्वस्त करणारा होता...पण आता आपल्याला आयुष्यभर या अंधत्वाच्या साथीनेच जगायचेय, हे वास्तव स्वीकारत वृषालीने मन खंबीर केले. दहावीला असताना दिसणे अधिक अंधूक होत गेले; पण तिने जिद्द सोडली नाही. बालपणापासूनच तिला गायन, वक्तृत्व, काव्यलेखन यांत गती होती. आवड होती. शाळेत असताना काव्यलेखन असो की जाहिरातींचे मसुदालेखन असो, वृषाली ते अगदी सहजतेने करायची. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, सायखेडा येथे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी वृषालीने नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेतला.
बारावीपर्यंत तिने स्वत:च पेपर लिहिले; पण त्यानंतर तिला लेखनिकाची गरज भासली. शिक्षण घेताना आलेल्या अनेक अडचणींना ती धैर्याने सामोरी गेली. जिद्द व परिश्रमांच्या जोरावर हिंदी विषयाची पदवी घेतल्यानंतर तिने केंद्र सरकारची स्कॉलरशिप मिळवली व उत्तर महाराष्ट्रातून एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी ती पहिली अंध महिला ठरली.
तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते युवा शक्ती सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय 'समाजप्रबोधन पुरस्कार-२००७' स्वीकारताना वृषाली शेख.
शैक्षणिक परीक्षांमध्ये यश मिळवले तरी समाजाची परीक्षा अजून बाकी होती! आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठीची धडपड सुरू असतानाच वृषालीची ओळख झाली डॉ. रज्जाक शेख यांच्याशी. महाविद्यालयात असताना वृषालीची उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी आलेल्या रज्जाक या युवकाशी झालेल्या ओळखीचे रूपांतर पुढे 'मैत्री'त, नंतर 'स्नेहा'त आणि पुढे 'जीवनसाथीदारा'त झाले.
शिक्षण, संगीत, संगणक अशा विविध क्षेत्रांत वृषालीच्या रूपाने एक अंध व्यक्ती चौफेर कर्तृत्व गाजवत आहे. 'आकाशवाणी'सारख्या अत्यंत आव्हानात्मक व आगळ्यावेगळ्या क्षेत्रात वृषाली हिने घेतलेली कर्तृत्वभरारी ही दृष्टिहीनांबरोबरच दृष्टी असलेल्यांनाही 'डोळस' प्रेरणा देणारी आहे. या सगळ्या प्रवासात साथ देणाऱ्या रज्जाक यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय वृषालीनं घेतला. या आंतरधर्मीय विवाहाला दोघांच्याही घरून कडाडून विरोध झाला; परंतु अनेक डोळस माणसांपेक्षाही अधिक प्रभावीपणे काम करणारे वृषाली आणि रज्जाक हे दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले...खंबीर राहिले.
रज्जाक यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतरही वृषालीने सामाजिक कार्य सुरूच ठेवले. रेल्वे स्टेशनवरील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी व व्यसनमुक्तीसाठी तिने तळमळीने काम केले, त्याचबरोबर अंधश्रद्धानिर्मूलन, महिलांमध्ये कायदेविषयक जागृती ही कामेही ती नाशिकमध्ये करते.
काहीतरी नवीन करण्याची वृषाली हिला इच्छा होती. या जिद्दीतूनच पती रज्जाक यांच्यासमवेत तिनं 'मिरॅकल' या अॅडव्हर्टायझिंग एजन्सीची स्थापना केली. मात्र, हा प्रवासही तितकासा सोपा नव्हता. या क्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करताना आपले अंधपण कामाच्या आड येऊ न देण्याचा वृषाली हिला सतत प्रयत्न करावा लागत होता. या घरच्या अॅड एजन्सीमध्ये ती स्क्रिप्ट-रायटिंग, व्हॉइसओव्हर, क्लायंट कम्युनिकेशन अशी कामे करू लागली.
आकाशवाणीसाठीही विविध स्वरूपाचे कार्यक्रम तयार करायलाही वृषालीने सुरुवात केली. सुरुवातीला तिचे अंधत्व तिच्या कामाच्या आड आले; परंतु तिच्या आवाजातील गोडवा आणि कल्पनाशक्ती यांमुळे अनेकांनी जाहिरातीसाठी तिच्याकडे संपर्क केला. पुढे `देशातील पहिली अंध रेडिओ-जॉकी` हा मानही वृषालीने मिळवला. वृषाली सांगते : ``नाशिक आकाशवाणीवर माझ्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व त्यातून हजारो श्रोत्यांशी माझे आपुलकीचे नाते जुळले.``
काव्यलेखनाबरोबरच अभिनय व गायन हे छंदही तिने जोपासले आहेत. काव्यलेखनाच्या व वक्तृत्वाच्या विविध स्पर्धांमध्ये तिला बक्षिसे मिळाली आहेत. संगीतक्षेत्रातील `प्रवेशिका माध्यम परीक्षा`ही तिने पूर्ण केली आहे. गिटार, पेटी, बुलबुलतरंग ही वाद्ये ती उत्तमप्रकारे वाजवते. अष्टपैलू असणाऱ्या वृषाली हिला सामाजिक कार्याचीही आवड आहे. स्वतःच्या वाढदिवशी ती विविध संस्थांना भेट देऊन या संस्थांना छोटया भेटवस्तू देते व वाढदिवस साजरा करते. ब्रेल भाषेत स्टेनोग्राफीचा अभ्यासक्रम, तसेच टेलिफोन-ऑपरेटरचा अभ्यासक्रमही तिने पूर्ण केला आहे.
``समाजात अंधांबद्दल जागरूकता कमी असल्यामुळे लोक मदत करत नाहीत,`` अशी खंत वृषाली व्यक्त करते व ``अंध बांधवांनीही स्वतःला कमी न लेखू नये आणि समाजाकडून खूप अपेक्षाही बाळगू नयेत`` असा सल्लाही ती देते.
``हेलन केलर, पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचारांचा माझ्या आयुष्यावर प्रभाव आहे. याशिवाय आई-वडील, बहीण अंजली, पती रज्जाक, तसेच विलास देशमुख आणि इतर मित्र-मैत्रिणींचाही माझी वाटचाल सुकर होण्यामध्ये मोठा वाटा आहे,`` अशी कृतज्ञता वृषाली व्यक्त करते.
गेल्या अनेक वर्षांपासून वृषाली आणि रज्जाक 'मिरॅकल'च्या माध्यमातून काम करत आहेत. एकमेकांच्या धर्मांचा आदर राखत आपल्या कामाला अधिक महत्त्व देऊन त्यांनी या क्षेत्रात आपले वेगळे स्थान आज निर्माण केले आहे. वृषालीची सादरीकरणाची पद्धत आणि तिचा आवाज ऐकून तिला अनेक श्रोते भेटायला येतात. हा अनुभव सांगताना वृषाली म्हणते : ‘‘डोळस माणसांपेक्षाही तुम्ही अधिक गुणवत्तापूर्ण काम करता, या श्रोत्यांच्या उद्गारांनी सगळ्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटते.''
‘‘अंधत्वाचे कारण पुढे करून आजवर कोणतेही काम मिळवलेले नाही,'' हे सांगताना वृषालीच्या आवाजातून स्वतःच्या कामाविषयीचा सार्थ आत्मविश्वास झळकत असतो. याच आत्मविश्वासाच्या सुरात वृषाली पुढे सांगते : ``आयुष्यात खचून जाण्याचे तर अनेक प्रसंग आले; पण काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या जिद्दीने आजवरचा प्रवास मी मोठ्या धीराने केला. ही तर प्रवासाची सुरुवात आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.``
देवाने एखादा अवयव कमी दिला तर किंवा काही कारणाने एखाद्या इंद्रियाची शक्ती काही कारणाने कमी झाली तर त्याची जागा भरून काढण्यासाठी तो दुसरी शक्ती देतो, असे म्हणतात; मात्र, ही शक्ती ओळखून तिचा योग्य तो उपयोग केला तरच तुमच्या जीवनाचे सार्थक होते. अंध असतानाही आपल्या अंतर्मनाचा आवाज साक्षी ठेवून आणि अंतःचक्षूंची शक्ती ओळखून वृषालीने हे कसब साधले आहे.
वृषालीला कविता खूप आवडतात, ती काव्यलेखन करते हा उल्लेख वर आला आहेच. शिवाय, वृषाली कविसंमेलनांचेही आयोजन करते. कविता हा तिचा आणि तिच्या मित्रपरिवाराचा मोठाच विरंगुळा आहे. आकाशवाणीवरील 'गुरुकृपा दहावी अभ्यासमाला' या २००६ मधील कार्यक्रमामुळे वृषालीच्या व्यावसायिक जीवनाच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. त्यानंतर तिने 'मिरॅकल मस्ती', 'मिरॅकल मसाला', 'ज्ञानरंगोली', 'मैत्री तुमची आमची', 'शतायू होऊ या', 'कायद्याचा आधार', 'जपू या पर्यावरण', 'गुलदस्ता-ए-गजल'... अशा एकापेक्षा एक सरस नि सुश्राव्य कार्यक्रमांद्वारे 'दिशा', 'ज्योती' या टोपणनावांनी रसिकश्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. आजही असंख्य श्रोते तिच्याशी प्रत्यक्ष, तसेच दूरध्वनीद्वारे जोडले गेले आहेत. तिच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेणाऱ्या श्रोत्यांच्या मेळाव्याचेही दर दिवाळीत 'स्नेहदीपावली' या नावाने आयोजन करण्यात येते.
अत्यंत चटपटीत निवेदनशैली हे वृषालीचे वैशिष्ट्य. त्यामुळे ती आणि तिचे कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरले. उपजतच असलेली दांडगी स्मरणशक्ती व संवादकौशल्य यांचा सुयोग्य वापर करून तिने 'आकाशवाणी'च्या क्षेत्रात देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. हिंदी-मराठी ध्वनिचित्रफितींना, माहितीपटांना, दृक्श्राव्य/ जाहिरातींना वृषाली आपला मधुर आवाज देत असते.
'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'कडून दखल
वृषाली हिच्या कामगिरीची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतली आहे. 'लिम्का'च्या अंकात तिचे नाव नोंदवले गेल्याने तिची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. वाट्याला आलेले अंधत्वाचे दुःख अगदी सहज झुगारत, डोळसाला लाजवेल, 'डोळस' दृष्टी देईल, अशा पद्धतीने प्रचंड धेयासक्तीच्या नि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळाव घेतलेले शिक्षण, नंतर मिळवलेली 'विद्यावाचस्पती' (डॉक्टरेट) ही पदवी अशी वृषाली यांची नेत्रदीपक शैक्षणिक कामगिरी आहे.
याशिवाय, आपल्या मधुर आवाजाने रोज सकाळी 'गुड मॉर्निंग नाशिक' द्वारे नाशिककरांना अन् पंचक्रोशीतील श्रोत्यांना रिझविणाऱ्या वृषाली यांची 'आवाज' हीच खरी ओळख आहे. याच आपल्या अनोख्या ओळखीने तिने 'लिम्का'चा 'पहिली अंध महिला रेडिओस्टार' हा मान पटकावला व तिची ओळख संपूर्ण देशाला झाली.
वृषाली हिला आजवरच्या कामाबद्दल विविध स्तरांवरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यातले काही पुरस्कार पुढीलप्रमाणे :
• 'आयेशा जागतिक कर्तृत्ववान अंध महिला पुरस्कार'
• ‘कल्पनेपलीकडचे मि. अँड मिसेस पुरस्कार'
• 'राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार'
• 'सर्वधर्मसमभाव प्रतिष्ठान'चा पुरस्कार
• 'समाजप्रबोधन' पुरस्कार
वृषालीच्या जीवनावर चित्रपट निघणार!
हैदराबादचे चित्रपटदिग्दर्शक पी. सी. आदित्य विक्रम हे नाशिक येथे एका कार्यक्रमानिमित्त मुक्कामी असताना त्यांना वृषालीच्या कामाची माहिती मिळाली. अंध असूनही जाहिरात, गायन, निवेदन, काव्यलेखन या सर्व बाबी ती एकाच वेळी करते याचे त्यांना कौतुक वाटले. अपंग नृत्यांगना सुधा चंद्रन यांच्यावर 'नाचे मयूरी' हा चित्रपट पूर्वी निघाला होता. त्याच धर्तीवर वृषालीच्याही जीवनावर संपूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याची घोषणा त्यांनी केली. `अंध असूनही एक मुलगी किती मोठी झेप घेऊ शकते, याचा आदर्श भारतीयांसमोर ठेवला जावा,` यासाठीच या चित्रपटाची निर्मिती असेल, असे पी. आदित्य यांनी म्हटले आहे.