आपला समाज हा सातत्याने बदलत असतो. त्या बदलाचे पडसाद महिलांच्याही जीवनमानावर होत असतात. त्यातून त्यांची भूमिका, महत्त्वाकांक्षा आणि दृष्टिकोन यामध्येही मोठा बदल होत असतो. आज समाजात समानतेने, बरोबरीने विकसित होण्यासाठी महिलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे किंवा तसे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. परंतु अजूनही ते वातावरण, अधिकार किंवा मोकळीक महिलांना मिळत नाहीत. मात्र त्या दिशेने पावले उचलण्यास नक्कीच सुरुवात झाली आहे.
जगभरात नुकताच महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरात देखील काही मुस्लिम संघटनांनी महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले. महिला दिनाचे औचित्य साधत रमजानच्या पाक प्रसंगी शहरात महिलांसाठी विशेष इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येत महिलांसाठी खास इफ्तार आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. महिलांना सामाजिक सहभाग वाढवा आणि त्यांना एकत्र येण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतु होता.
हा समारंभ बोपोडीतील डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयात अतिशय आनंददायी वातावरणात पार पडला. रमजानच्या महिन्यात महिलांसाठी विशेष इफ्तारचे आयोजन करून त्यांना धार्मिक व सामाजिक सौहार्दाचा अनुभव देण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
माजी आमदार दीप्ती चौधरी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, माजी नगरसेवक नंदलाल धिवार, जुबेर पिरजादे, अन्वर शेख, प्राजक्ता गायकवाड, सायली जाधव, दिलशाद आत्तार, संजीवनी देवकुळे, कमल गायकवाड, मोनिका पठारे, ग्रॅसी गोरडे, आख्तरी शेख, रेश्मा कांबळे, इंद्रजीत भालेराव, शाबुद्दीन काझी, मदार शेख, सुफियान शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
सफाई कामगार महिलांचा सन्मान
परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा गोळा करण्याचे महत्त्वाचे काम देशातील सफाई कर्मचारी करत असतात. शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये त्यांचे योगदान सर्वात महत्वाचे असते. मात्र त्यांची त्याविषयीची कृतज्ञता आपण व्यक्त करत नाही, हीच बाब लक्षात घेऊन शहरात महिला दिनानिमित्त अशाच सफाई कामगार भगिनींचा सन्मान करण्यात आला. कोंढव्यातील निसार फाउंडेशनच्या वतीने परिसरातील इंद्रायू मॉलमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाफिज शेख व सल्लागार सदस्य अकबर खान यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना हाफिज शेख म्हणाले की, “भारत देशात अनेक कर्तबगार महिलांनी त्याग, परिश्रम, बलिदानाने मानाचे स्थान निर्माण केले आहे. अशा सर्व कर्तबगार महिलांची यशोगाथा अगदी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातिमाबी, आदर्श समाजसेविका सिंधुताई संकपाळ अशा सर्वच कर्तबगार महिलांनी समाजाच्या जडणघडणीत आपले योगदान दिले आहे. अशा सर्व महिलांना स्मरणात ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले.”
फाउंडेशनचे सल्लागार सदस्य अकबर खान यांनी बोलताना म्हटले की, “फक्त महिला दिन म्हणून नारीचा सन्मान न करता आपल्या भारतीय परंपरेनुसार सदैव नारीचा सन्मान केला पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात आपल्या माता-भगिनी सुरक्षित दिसत नाही याची देखील खंत वाटते.”
या कार्यक्रमाला चांद बळबट्टी, मुस्ताक शेख, टी बँक चे संस्थापक अध्यक्ष नासीर शेख, अध्यक्ष हडपसर मतदार संघ बहुजन पालक संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख, झाकिर पठाण आदि मान्यवर उपस्थित होते.