पवित्र श्री अमरनाथ यात्रेची सोमवारी (१९ ऑगस्ट)यशस्वीपणे सांगता झाली. यावर्षी सुमारे पाच लाख यात्रेकरूंनी हिमालयात असलेल्या बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. २९ जून रोजी सुरू झालेली ही यात्रा ५२ दिवसांनी कडेकोट बंदोबस्तात संपन्न झाली. ही यात्रा यशस्वीपणे पार पडल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व सुरक्षा कर्मचारी, श्री अमरनाथ जी श्राइन बोर्ड, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचे अभिनंदन केले.
शाह यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'श्री अमरनाथ यात्रा यशस्वीपणे पूर्ण झाली. ५२ दिवस चाललेल्या या यात्रेत यावेळी ५.१२ लाखांहून अधिक भाविकांनी बाबांचे दर्शन घेतले, ही गेल्या १२ वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे. पुढे ते म्हणतात, ही यात्रा यशस्वी करण्यासाठी मी आमच्या सर्व सुरक्षा कर्मचारी, श्री अमरनाथ श्राइन बोर्ड, जम्मू आणि काश्मीर प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचे अभिनंदन करतो. भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ करण्यात तुम्हा सर्वांचे अनन्यसाधारण योगदान आहे. बाबांनी सर्वांवर आशीर्वादाचा वर्षाव करावा. जय बाबा बर्फानी!'
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी साडेचार लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुहा मंदिरात बाबा बर्फानीचे दर्शन घेतले होते. सर्वांत खडतर समजल्या जाणाऱ्या अमरनाथ यात्रेदरम्यान, भाविक जम्मू आणि काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम ते गुहा मंदिरापर्यंत दोन मार्गांनी प्रवास करतात. या काळात स्थानिक काश्मिरी जनता या यात्रेकरूंची विशेष सेवा करते.