सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर रमशा अन्सारी झाली उपअधीक्षक

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
रमशा अन्सारी
रमशा अन्सारी

 

आज स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींचे पोलीस आणि प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न त्या निवडक लोकांचेच पूर्ण होते, जे मोठ्या जिद्दीने स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे भोपाळच्या रमशा अन्सारी हिची.

नुकताच मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (एमपीपीएससी) राज्य सेवा परीक्षा २०२२चा निकाल जाहीर झाला. पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदासाठीच्या या परीक्षेत रमशा अन्सारी टॉपर ठरली. भोपाळच्या एयरपोर्ट रोड परिसरात राहण्याऱ्या रमशा अन्सारीने १५७५ पैकी ८७८ गुण मिळवून पोलीस उपअधीक्षक पदाचा मान मिळवला आहे.

रमशा एका सर्वसामान्य मुस्लीम कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील अशरफ अन्सारी भोपाळमध्ये कृषी विभागाचे निवृत्त क्लार्क आहेत. तिची आई संजीदा अन्सारी या गृहिणी आहेत. रमशाला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. तिच्या कुटुंबाला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. रमशाची मोठी बहिण देखील सीए आहे. 
 

रमशाचे प्राथमिक शिक्षण 
रमशाचे शालेय शिक्षण भोपालच्या सेंट मेरी स्कूलमधून झाले. तिचे माध्यमिक शिक्षण कॉमर्स विभागातून झाले आहे. त्यानंतर तिने भोपाळच्या एक्सिलन्स कॉलेजमधून बीए इकोनॉमिक्स ऑनर्स पूर्ण केले. मग तिने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून इतिहास विषयात एमए केले. एमए केल्यानंतर रमशाने UGC- NET- JRF सारख्या परीक्षा दिल्या आणि त्यात चांगले गुण देखील मिळवले. परंतु तिने अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याऐवजी प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले.

रमशाने २०१८ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती परंतु त्यात यश न मिळाल्यामुळे तिने मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (एमपीपीएससी) परीक्षेची तयारी सुरु केली. यावेळी तिने दोन वेळा प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेत ती पास झाली. परंतु मुलाखतीत कमी गुण मिळाल्यामुळे तिची निवड होऊ शकली नाही. परंतु तरीही तिने हार मानली नाही. 

रमशाच्या ७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तिला चौथ्या प्रयत्नात यश मिळाले. या परीक्षेच्या तयारी विषयी विचारले असता ती सांगते, “दररोज ८ ते १० तासांचा अभ्यास आवश्यक आहे. परंतु हे किती वर्ष करावे लागेल, हे अभ्यास करणाऱ्याची क्षमता आणि त्याला मिळालेल्या मार्गदर्शनावर अवलंबून आहे. जर २ ते ३ वर्ष पूर्ण लक्ष केंद्रित करून तयारी केली, तर यश सहज मिळू शकेल. परंतु यामध्येही जर तुम्हाला यश मिळाले नाही, तर मागे न हटता दुप्पट मेहनतीने तयारी करा.”

ती पुढे म्हणते, “सुरुवातीला मी यूपीएससीचीही तयारी करत होते. दोन्ही परीक्षांबद्दल खूप गोंधळात होते आणि एकाच वेळी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत होते. त्यानंतर कुटुंब आणि मित्रांच्या मार्गदर्शनाने मी पूर्णपणे एमपीपीएससीची तयारी सुरू केली.२०१८ पासून मी तयारीला सुरुवात केली आणि सात वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर मला यश मिळाले.”

“परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर शिस्तबद्ध असणे खूप गरजेचे आहे. ज्या विषयावर तुमची पकड मजबूत आहे त्या विषयची आधी तयारी करा. सोबत बाकीच्या विषयांची माहिती गोळा करा आणि आवडीने अभ्यास करा.” असे ती म्हणते. 

तासंतास लायब्ररीत बसायचे..   
रमशा सांगते की, “अभ्यासासाठी मी दररोज ८ ते १० तास लायब्ररीत बसायचे. त्यामुळे माझ्या पाठीच्या दुखण्याची समस्या उद्भवली होती. मानसिकदृष्ट्या देखील अनेक कठीण प्रसंग आले. नेहमीच असं सांगितलं जातं की एक वर्षाची मेहनत करा, सर्व काही मिळवता येईल... पण प्रत्यक्षात तसं काही शक्य नसतं.”

रमशाला मिळालेल्या यशानंतर तिचे वडील अशरफ अन्सारी यांनी भावना व्यक्त केली. ते म्हणाले, “आम्ही आमच्या मुलीला देता येईल तेवढा मानसिक आणि आर्थिक पाठींबा देण्याचा प्रयत्न केला. तिने अभ्यास सुरु केल्यानंतर तिचे गांभीर्य लक्षात घेता आम्ही तिला क्लासेस लावण्याचे ठरवले. तिनेही जास्तीची अपेक्षा न ठेवता उपलब्ध शैक्षणिक साधनांमध्ये अभ्यास करून यश संपादन केले. त्यामुळे आम्हाला तिचे कौतुक आहे.” 

मुस्लिम तरुणींना शिक्षणासाठी प्रोत्साहन 
रमशा ही सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील मुलगी. कुटुंबाने तिला अधिकारी होण्यापर्यंतच्या प्रवासात कशी साथ दिली, याबाबत विचारले असता ती सांगते, “मी सामान्य कुटुंबातील असून आईवडील आणि गुरुजनांनी शिक्षणासाठी लहानपणापासून प्रोत्साहन दिले. यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकले. माझ्या कुटुंबाने जसे मला माझ्या मोठ्या बहिणीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले तसेच प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलींना पाठबळ द्यावे.”

रमशाने मुस्लिम समाज आणि विशेषतः त्या समाजाच्या मुलींसाठी संदेश दिला. ती म्हणते की, “आपल्याला सध्या शिक्षणामध्ये अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण हे एक असे शस्त्र आहे, त्याच्या मदतीने आपण आपले कुटुंब, समाज आणि देशाचे कल्याण करू शकतो. कारण शिक्षण आपल्या मनाचा आणि बुद्धीचा विकास करण्यास सक्षम करते आणि आपल्या जीवनाला अर्थ देते. शिक्षण स्वतःच्या जीवनाबरोबरच इतरांचे जीवन देखील सुधारू शकतो. देशाच्या प्रगतीत आपले योगदान देऊ शकतो. म्हणूनच शासकीय सेवेत मुस्लिम तरुण-तरुणींनी नक्कीच यायला पाहिजे.”

रमशा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेस घेत होती. ती म्हणते की, “माझ्या या यशात माझ्या विद्यार्थ्यांचा देखील मोठा वाटा आहे. माझ्या घरच्यांनी जसा मला सगळ्या गोष्टींमध्ये पाठिंबा दिला तसेच प्रोत्साहन मला माझे विद्यार्थी देत असत. ते नेहमीच माझा आत्मविश्वास वाढवतात. मला जेव्हा जेव्हा हरल्या सारखे वाटायचे तेव्हा तेव्हा माझे विद्यार्थी मला मानसिक पाठबळ देत असत.”

रमशा शेवटी म्हणते, “जर तुमच्या अथक प्रयत्नांनंतरही तुम्ही पहिला टप्पा पार करू शकत नसाल, तर तुम्ही स्वत:ला प्रश्न विचारावा की, ‘मी यासाठी तयार आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर तुम्ही पुढचे निर्णय घ्यावेत.”

तुमच्याकडे जिद्द असेल तर तु्म्ही कोणतेही अवघड काम करु शकता, फक्त त्यासाठी तुम्हाला केवळ स्वत:वर विश्वास असावा लागतो. याच जिद्दीने निघालेल्या भोपाळची लेक रमशा अन्सारीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. तिला तिच्या पुढील कार्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी ‘आवाज द वॉईस’तर्फे शुभेच्छा!

- भक्ती चाळक 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter