बहुजनांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी निर्माण केलेल्या सातारच्या रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांतून अध्यापन करणाऱ्या प्रा. डॉ. रोशनआरा शेख या ३९ वर्षे दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेतून नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. सातारच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उपप्राचार्या तथा इंग्रजी विभागप्रमुख या पदावर त्यांनी उल्लेखनीय काम केले. आपल्या वैयक्तिक कलागुणांनी विद्यार्थ्यांना संघटीत करुन बहुविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी घडवून आणले. मराठी रंगभूमीवर खासकरुन महाविद्यालयीन जीवनातील एकांकिका स्पर्धेत मानाची समजली जाणाऱ्या पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही त्यांनी कॉलेजला मिळवून दिले आहे.
मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी स्त्री शिक्षणाचे महत्व, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आणि भारतीय संगीत व समृद्ध नाट्य परंपरा यांचे बाळकडू त्यांना लहानपणी घरात मिळाले. कारण मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सुरुवातीच्या काळातील अध्यक्ष तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक एस. बाबुमियाँ बँडवाले यांच्या त्या नात.
तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा शहरातील बाबू ब्रास बँडचे प्रमुख असलेले संगीत विशारद मेहबूब बाबुमियाँ यांच्या त्या कन्या. स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सहभाग आणि सामाजिक निधी उभारण्यासाठी नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून राबविलेले विविध उपक्रमात त्यांचा कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. मेहबूब बाबुमियाँ हे क्लॅरोनेट वादनात माहीर होते. बहारो फुल बरसाओ, मेरा मेहबूब आया है त्यांचे संगीतवृंदावरील गीत खूप गाजले होते. सांगण्याचे तात्पर्य, डॉ. रोशनआरा यांना हा सांस्कृतिक वारसा उपजत मिळाला.
डॉ. रोशनआरा यांच्या आजी कन्या शाळेच्या मुख्याधापिका होत्या. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथे घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अहमदनगर कॉलेजमध्ये दाखल झाल्या. त्यांनी पुणे विद्यापीठातून बी. ए. आणि एम. ए पदवी संपादन केली. अभ्यासातील शिस्त आणि नेमस्तपणा हा त्यांचा वाखाणण्याजोगा गुण.
पदवी परिक्षेत त्या प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाल्या. आपली शैक्षणिक कारकिर्द घडविण्याचे श्रेय त्या मातोश्री दिवंगत राबिया सय्यद यांना देतात. मातोश्री राबिया सय्यद यांचे माहेरचे नाव काझी. त्या घरात शिक्षणाची परंपरा होती. त्यांच्या आईचे एक बंधू शिक्षक काझी गुरुजी होत तर आईचे दुसरे बंधू एस.टी. महामंडळात कंट्रोलर पदावर कार्यरत होते.
उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८६मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी रयत शिक्षण संस्थेच्या शिरवळ येथील विनाअनुदानित कॉलेजमध्ये त्या अध्यापक म्हणून रुजू झाल्या. पुढे १९९४मध्ये कोरेगावच्या डी. पी. भोसले कॉलेजमध्ये त्यांची बदली झाली. २०१०मध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात त्या इंग्रजी विभागप्रमुख झाल्या. जून १९८० पासून त्यांची बदली रयतच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झाली. तेथे सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि नॅक क्रायटेरिया क्रमांक दोनची जबाबदारी त्यांनी पार पाडली. २०२०पासून त्या कॉलेजच्या उपप्राचार्य या पदावर विराजमान झाल्या.
तत्कालीन पुणे विद्यापीठातून त्यांनी पी.एचडीही संपादन केली. त्यांचे अनेक विषयांवरील ३० पेक्षा अधिक इंग्रजी शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रकाशित झाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानातूनही त्यांनी शोध निबंध प्रकल्प पूर्ण केला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या विषयावर प्रभुत्व असलेल्या डॉ. रोशनआरा तीनही भाषेत उत्तम निवेदन करतात. महिला सक्षमीकरण या विषयावर त्या मार्गदर्शनही करतात.
शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या नियामक मंडळाच्या सदस्य, इंग्रजी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा, इंग्लिश संशोधन सल्लागार प्रमुख या जबाबदाऱ्या पार पाडत असताना, नियोजन, शिस्त, कमालीचा वक्तशीरपणा या गुणांच्या जोरावर विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक अशी त्यांची ओळख.
पुरोगामी व सुधारणावादी चळवळींशी निकटचा संबंध असलेले आणि जिल्हा बँकेवर उच्चपदस्थ असलेले त्यांचे पती सुजित शेख हे देखील सामाजिक चळवळीतील चांगले व्यक्तीमत्व. बँकिंग व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पती सुजित शेख आणि त्यांचे उच्चविद्याभूषित चिरंजीव रोहित शेख यांचाही डॉ. रोशनआरा यांच्या कार्यात सक्रिय सहभाग असतो.
बहुजन समाजातून येणाऱ्या आणि सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील डॉ. रोशनआरा शेख यांच्या शिक्षण क्षेत्रातील गौरवशाली कामाचा त्यांचे मूळ गाव असलेल्या श्रीगोंदेकरांना रास्त अभिमान आहे. चांगल्या सामाजिक कामाचा उत्तुंग वारसा पुढे नेण्याचे कार्य डॉ. रोशनाआरा यांनी केले आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुमियाँ बँडवाले यांचा वैचारिक व सामाजिक वारसा नव्या पिढीसमोर नेण्याचे त्या अनमोल कार्य करीत आहेत.
रयतच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. रोशनआरा शेख यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने पाच फेब्रुवारी २०२५ रोजी सातारा शहरात सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ झाला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात ३९ वर्षांची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या डॉ. रोशनआरा शेख यांच्या शैक्षणिक कार्यास मनापासून सलाम. आणि डॉ. रोशनआरा यांना भावी शैक्षणिक व सामाजिक वाटचालासाठी शुभेच्छा. यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही निसर्गाकडे प्रार्थना.
- समीर मणियार
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी कार्यकर्ते आहेत.)