नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. व्रत-वैकल्ये केली जातात. महिलांच्या शौर्याची आणि धैर्याची अनेक उदाहरणे आपल्याला भारतीय संस्कृतीत मिळतात. वर्तमानकाळातही वेगवेगळ्या क्षेत्रांत शौर्य गाजवणाऱ्या असंख्य कर्तुत्वत्वान महिलांनी क्षितीज व्यापलेले आहे. या नवरात्रामध्ये 'आवाज मराठी'वरून अशाच काही कर्तुत्ववान मुस्लीम महिलांची ओळख करून दिली जाणार आहे. आपल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या अशाच एका महिलेच्या कार्याची ओळख करून देणारा हा विशेष लेख.
'अगर किसी भी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है।'...२०२० च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत मुलींमध्ये तिसरी आलेल्या वसीमा शेखकडे पाहून शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या सिनेमातल्या या डायलॉगची प्रचीती येते. उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या वसिमाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले स्वप्न पूर्ण केले.
वसिमा मुळची नांदेड जिल्यातील लोहा या गावची. घरची परिस्थिती बेताचीच.. त्यात ती घरातले चौथे अपत्य. २० - २२ वर्षांपासून सतत आजारी असलेले वडील, जोडीला चार बहिणी-दोन भाऊ आणि आई असा आठ जणांचे मोठे कुटुंब परिवार… खाणारी तोंडे आठ आणि कमावणारी फक्त दोन!
शिक्षण मिळणे हाच एक संघर्ष होता. त्यात उच्च शिक्षण मिळवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे ही तर स्वप्नवत गोष्टच. मात्र या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासून वसीमाचा शैक्षणिक प्रवास सुरु झाला. २०१५ मध्ये तिचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.
पदवी पूर्ण झाल्यावर वसीमा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली. २०१७ च्या ‘विक्रीकर निरीक्षक’ या पदासाठी महाराष्ट्र राज्यसेवा नागरी परीक्षेचा निकाल लागला आणि पहिल्याच प्रयत्नात वसिमा विक्रीकर निरीक्षक झाली. कुटुंबियांना, नातेवाईकांना आनंद झाला होता, वसीमा आर्थिक दृष्ट्या ती स्थिरावली. मात्र तिचे स्वप्न अजूनही अपूर्ण होते, कारण तिला ध्यास होता उपजिल्हाधिकारी पदाचा.
वसिमा पुन्हा अभ्यासाला लागली. हातात ‘विक्रीकर निरीक्षक’ चे पद होते. त्यामुळे काम आणि अभ्यास अशी दुहेरी जबाबदारी तिच्या खांद्यावर आली होती. कोणती पुस्तकं वाचावीत? ती कुठं मिळतील? कुणाचे मार्गदर्शन घ्यावे? तिच्यापुढे प्रश्नांचा डोंगर होता.पण उपजिल्हाधिकारी होण्याचा तिचा निश्चय दृढ होता, प्रयत्न प्रामाणिक होते आणि अभ्यासात सातत्य होतं. तिने पूर्वी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांचे व्हिडिओ पाहिले. त्यांचे मार्गदर्शन घेतले. २०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उपजिल्हाधिकारी पदासाठीची जाहिरात आली. आणि २०२० मध्ये ध्येयवेडी वसिमा उपजिल्हाधिकारी झाली.
शिक्षण घेतलं, अभ्यास केला, परीक्षा दिली आणि पास झाली आणि उपजिल्हाधिकारी झाली… हे गणित एवढं सोपं कधीच नव्हतं. हा तिला बऱ्याच आव्हानांचा सामना करायचा होता. तिच्या बोलण्यातून तिच्या संघर्षाचे चित्र डोळ्यासमोर उभे रहात होते. बारावीपर्यंत घरात लाईट नव्हती. एका खोलीचंच घर. खोली कुठली, पत्र्याचे शेडच!; त्यात राहणारे आठ जण! ग्रामीण भागात असणारी साधनांची कमतरता, महिलांबाबतचा समाजाचा उदासीन दृष्टीकोन, समाजातली परदा पद्धती… असे सगळे अडथळे पार करून जाण्याची कमाल वसिमानं करून दाखवली.
तिच्या बोलण्यात सामाजिक आव्हानांचाही उल्लेख आला. ती म्हणते, 'माझं पदवी पर्यंतचं शिक्षण झालेलं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. दरम्यानच्या काळात लोकांसाठी, नातेवाईकांसाठी मी चर्चेचा आणि उपहासाचा विषय झाले होते.'. तिने परिक्षा दिली आणि दरम्यान तिचे लग्नही झाले. एकीकडे पती हैदर यांच्यासोबत सहजीवन फुलत होते तर दुसरीकडे परीक्षेच्या निकलाचीही ती आतुरतेने वाट बघत होती. निकालाची बातमी आली, आणि वसिमाचे आयुष्यच बदलून गेले.
चर्चेचा आणि उपहासाचा विषय बनलेली वसिमा निकालातील यशानंतर समाजासाठी रोल मॉडेल बनली. तिला नावं ठेवणारेच आता तिचे कौतुक करायला लागले. तिच्या यशामुळे सगळ्यांचे डोळे दिपून गेले होते. दृष्टिकोन बदलला होता. लग्न झाल्यानंतर आठ दिवसांनीच उपजिल्हाधिकारी पदाचा निकाल लागला. त्यामुळे सासरच्या मंडळींमध्येही वसिमाविषयीचा आदर वाढला.
वसिमा सांगते की, अशा यशाचा समजावर सकारात्मक परिणाम होतो. त्यांनी आपला प्रामाणिक संघर्ष पाहिलेला असतो. आपल्यासारखीच एक सामान्य मुलगी इथपर्यंत पोहोचली हे पाहून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मला भेटणाऱ्या मुली कायम म्हणतात, ‘तुम्ही केले, आता आम्हीही हे करू शकतो.’
सध्या वसिमा अमरावती जिल्ह्यातील भटकुळी उपविभागीय दंडाधिकारी (सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट- SDM) या पदावर कार्यरत आहेत. आता तिने जिल्हाधिकारी होण्याचे ध्येय ठेवले आहे आणि त्या दिशेने प्रवासही सुरु आहे.
समाजाच्या भविष्याविषयीही वसिमा आशादायी आहे. ती म्हणते, मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यातही महिला साक्षरतेचे प्रमाण अजूनच कमी आहे. भविष्यात ते वाढत जाईल. या समाजातील १००% लोक साक्षर होतील!’
तू समाजाला काय संदेश देऊ इच्छिते असे विचारल्यावर वसिमा म्हणाली, ‘मी जे केले तोच एक संदेश नव्हे का?’ ती पुढे म्हणते, ‘अडथळे प्रत्येक ठिकाणी येतात. अशा वेळी आपला आत्मविश्वास डगमगतो आणि आपण थांबतो. तसे होता कामा नये. येणाऱ्या प्रत्येक संकटाला हिमतीने सामोरे गेले पाहिजे. आव्हानाला प्रोत्साहन समजून आपण सातत्याने लढत राहिलो तर गोष्टी सोप्या होतात. कितीही संकटे आली तरी जिद्द जिवंत ठेवली पाहिजे!’
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या कर्तुत्ववान मुस्लीम महिलांच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
'डोंगरी के सब भाय शबानाताईसे डरते...!'
देशातील पहिली अंध रेडिओ-जॉकी डॉ. वृषाली शेख!
पालघरच्या शेख कुटुंबातील तिन्ही मुली समाजासाठी ठरताहेत प्रेरणास्रोत
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
WhatsApp | Telegram | Facebook
| Twitter | Instagram | YouTube