'काव्यफुले'चा उर्दू अनुवाद करणाऱ्या डॉ. नसरीन रमजान.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. व्रत-वैकल्ये केली जातात. महिलांच्या शौर्याची आणि धैर्याची अनेक उदाहरणे आपल्याला भारतीय संस्कृतीत मिळतात. वर्तमानकाळातही वेगवेगळ्या क्षेत्रांत शौर्य गाजवणाऱ्या असंख्य कर्तुत्वत्वान महिलांनी क्षितीज व्यापलेले आहे. या नवरात्रामध्ये 'आवाज मराठी'वरून अशाच काही कर्तुत्ववान मुस्लीम महिलांची ओळख करून दिली जाणार आहे. आपल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या अशाच एका महिलेच्या कार्याची ओळख करून देणारा हा विशेष लेख.
उर्दू ही भारतीय भाषा. मात्र ती परकीय असल्याचा अनेकांचा समज. ती मुस्लिमांची भाषा असल्याचा अनेकांचा (आणि खुद्द मुस्लिमांचाही) गैरसमज. बरेच धार्मिक साहित्य उर्दूत अनुवादित झाल्यामुळे मुस्लीम समाजाचा या भाषेकडे ओढा अधिक. स्वाभाविकपणे काव्य आणि धार्मिक गोष्टी यांपलीकडे उर्दुकडे अजूनही बघितले जात नाही,हे या भाषेचे दुर्दैव! एकेकाळी भारतातील उतमोत्तम साहित्यनिर्मिती उर्दूत व्हायची. प्रेमचंदसारखे महान साहित्यिक उर्दुतच लिहायचे. मात्र देशाचे विभाजन झाले. पाकिस्तानने उर्दू राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारल्यामुळे उर्दू आणि मुसलमान हे गणित आणखी दृढ झाले.
स्वाभाविकच मुस्लिमेतरांचा उर्दूतील सहभाग कमी होत गेला आणि उर्दू साहित्य मुस्लीमकेन्द्री होऊ लागले. त्यामुळे केवळ उर्दू जाणणारे मुस्लीम इतर भाषांमधील सकस साहित्याला मुकले. सामाजिक सुधारणा आणि स्त्रीपुरुष समानता यांविषयी जुजबीच लेखन या भाषेत झाले. अनुवादही कमी झाले. स्वाभाविकपणे देशातील अनेक समाजसुधारक आणि त्यांचे कार्य उर्दू भाषिकांपर्यंत (आणि परिणामी बहुतांश मुस्लिमांपर्यंत) म्हणावे तसे पोहोचू शकले नाही. ही उणीव जाणवली डॉ. नसरीन रमजान या पुण्यातील एका उर्दू शिक्षिकेला. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे कार्य आणि साहित्य यांच्याशी परिचय होताच, त्यामुळे त्यांनी सावित्रीबाईंचे साहित्य उर्दूत अनुवादित करण्याचा निर्णय घेतला आणि सावित्रीबाई यांचे ‘काव्यफुले’ या पुस्तकाचा उर्दूत अनुवाद केला. सोबतच महात्मा फुलेंचे उर्दूतून छोटेखानी चरित्रही लिहले. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांना उर्दू भाषिकांपर्यंत घेऊन जाण्याचे मोठे काम डॉ. नसरीन रमजान यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची ओळख करून देणारा हा लेख खास ‘आवाज मराठी’च्या वाचकांसाठी...
- संपादक
प्रेमाची भाषा जेव्हा अचानक इतिहास बोलू लागते तेव्हा? असच काहीसं घडतंय सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात. आणि हे घडवून आणणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीचे नाव आहे डॉ. नसरीन रमाजान.
डॉ.नसरीन या मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील. घरातील सात भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या. त्यांनी प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावातून म्हणजे बार्शीतून पूर्ण केले. सातवी पर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमातून झाले. त्यानंतर कन्या शाळेत प्रवेश घेतला आणि दहावीपर्यंतचे शिक्षण तेथून पूर्ण केले. मात्र येथे त्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर उर्दुतुनही त्यांनी दहावीची परीक्षा पुन्हा दिली. सोबतच त्यांनी शिवणकाम, गृह उद्योग अशा अनेक विषयांचे शिक्षण घेतले. १९८७ मध्ये त्यांनी ‘डीएड’ झाल्या. इथे हा शैक्षणिक प्रवास थांबला,पण काही काळापुरताच. याच वर्षी त्यांचे वैवाहिक आयुष्य सुरु झाले.
लग्न होऊन पुण्यात आल्यानंतर त्यांनी ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ(एसएनडीटी) विद्यापीठातून बीए केले. १९९१ मध्ये त्या पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. शिक्षिका म्हणून काम करत असतानाच त्यांनी पुणे विद्यापीठातून बी. एड., एम ए, एम एडही पूर्ण केले. त्यांची ही घोडदौड अशीच सुरु राहिली आणि २०१० मध्ये त्या डॉक्टरेट झाल्या. सध्या त्या पुणे महानगरपालिकेच्या पर्वती येथील उर्दू शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
२००४ मध्ये नसरीन आणि त्यांची मैत्रीण यादोघींनी मिळून ‘एक कहाणी एक नसिहत’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले. यानंतर डॉ. नसरीन यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. त्यांच्या 'जिंदगी एक अफसाना' या पुस्तकाला 'महाराष्ट्र राज्य ऊर्दु साहित्य अकादमी' चा तर्फे पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्यिक योगदानमध्ये सर्वांत लक्षणीय ठरले सावित्रीबाई फुले यांच्या ’काव्य फुले’ या काव्यसंग्रहाचे उर्दूमध्ये केलेले भाषांतर. यानंतर त्यांनी ‘महात्मा ज्योतिराव फुले के नजरिया और उनका अदब’ हे पुस्तक लिहिले. अशाप्रकारे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे कार्य उर्दू वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम डॉ. नसरीन यांनी केले.
सावित्रीबाईंचे साहित्य अनुवाद करण्यामागची प्रेरणा काय होती, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, ‘घोरपडी येथे शिक्षिका म्हणून काम करताना दरवर्षी आम्ही भिडेवाड्यावर मुलांची सहल नेत होतो. त्यावेळेस अचानक वाटून गेलं की एवढं लिहते आहेच तर मुलींसाठी शिक्षणाचे द्वार खुले करणाऱ्या सावित्रीबाईंचेवर का लिहू नये? काळ बदलला असला तरी सामाजिक परिस्थिती अजूनही तशीच आहे, ही बाब सावित्रीबाईंच्या कविता वाचताना प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे त्यांच्या काव्य संग्रहाचा अनुवाद करण्याच मी ठरवलं.' 'काव्यफुले च्या या उर्दू अनुवादाला मुस्लिम समुदायाकडून चांगला प्रतिसाद मिळाला.' उर्दूत अनुवाद केल्यामुळे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे कार्य आणि साहित्य अधिकाधिक मुस्लिमांपर्यंत पोहोचू शकले याविषयी डॉ. नसरीन यांनी समाधान व्यक्त केले.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमा शेख यांच्याबद्दल खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध व्हावी यासाठी डॉ. नसरीन यांनी महाराष्ट्र पालथा घातला. ही माहिती जमा करायला त्यांना तब्बल आठ वर्षे लागली. या संशोधनाच्या आधारे फातिमा शेख यांच्यावर उर्दूतील त्यांनी एक पुस्तिका लिहिली. फातिमा शेख यांच्यावरील उर्दूतील हे पहिले पुस्तक! आता फातिमा शेख यांच्यावर हिंदीतून पुस्तक लिहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे उर्दूतून चरित्र लिहिण्याचा मानस आहे.
डॉ. नसरीन यांना साहित्यिक योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी, शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल २०१७ मध्ये शिक्षण मंडळ- पुणे महानगरपालिकेतर्फे मिळालेल्या 'ज्ञानज्योती फातिमा बी, महिला व अपंग बाल विकास संस्था टिटवाळा, ठाणे यांच्यातर्फे अल्पभाषिक विशेष शिक्षक पुरस्कार. याव्यतिरिक्त त्यांना उर्दू अनुवादासाठी ‘सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्कार २०२३’ हे पुरस्कार विशेष आहेत.
नसरीन यांच्या या प्रवासात कुटुंबियांची विशेषतः त्यांच्या पतीची चांगली साथ मिळाली. याविषयीची एक आठवण सांगताना त्या म्हणतात, ‘मी येरवड्याच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्याचवेळी एसएनडीटी येथे माझे पुढील शिक्षण सुरु होते. परीक्षेच्या काळात माझा नवरा मला घ्यायला सायकलवर येरवड्याला येत असे. तिथून आम्ही दोघे ‘एसएनडीटी’ला येयचो. माझा पेपर संपेपर्यंत ते तिथेच बसून राहायचे. त्यानंतर आम्ही घरी जात होतो.' हा अनुभव सांगितल्यानंतर 'मी भाग्यवान!' हे वाक्य त्यांच्या तोंडून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसत होती. निरोप घेताना त्यांनी व्यक्त केलेली भावना खूप महत्वाची होती. त्या म्हणाल्या 'कुटुंबाची साथ आणि समाजातून मिळणारी कौतुकाची थाप माझा कामाचा उत्साह द्विगुणीत करते!'