मुस्लीम स्त्रीच्या भावनाकल्लोळाची मराठी रंगमंचावरील पहिली अभिव्यक्ती

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र या समाजातील घटना, तसेच समाजातील धारणा, त्यांच्या भावना, इच्छा, आकांक्षा यांचे प्रतिबिंब साहित्यात, चित्रपटात किंवा नाटकात तेवढ्या प्रमाणात पडलेले दिसत नाही. त्यामुळे जी पात्रे चित्रपट आणि नाटकांमध्ये दिसतात ती अगदी साचेबद्ध असतात. त्यामुळे त्या समाजातील व्यक्तींचे खरे प्रतिबिंब आपल्याला साहित्यात पडताना दिसत नाही. विशेषतः महिलांची तर गोष्टच वेगळी आहे. भारत हा पुरुषप्रधान देश असल्याने महिलांवर अधिक बंधने आहेत. 

भारतात अजूनही चूल आणि मुल या चौकटीत महिलांना बसवले जाते. मुस्लीम समाजातही पुरुषप्रधान संस्कृती जास्त असल्याने मुस्लीम महिलांच्या अभिव्यक्तीला इतर धर्मीय महिलांपेक्षा अधिक बंधने आहेत. त्यामुळे साहित्य संस्कृतीत आधीच कमी प्रतिबिंब पडत असताना या समाजातील स्त्रियांचे साहित्यात खूप कमी वर्णन दिसून येते. मात्र आता मराठीत नव्याने आलेल्या एका नाटकाने ही उणीव भरून काढली आहे. 'ए बिस्मिल्ला' हे नाटक हिनाकौसर खान यांनी लिहिले आहे.

समाजातील एका विशिष्ट वृत्तीमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या कायम दुर्लक्षित राहील्या आहेत. विशेषतः आजूबाजूची परिस्थिती पाहता एकूण मुस्लीम समाजावर होणाऱ्या परिणामांवर बोलण्याचे प्रमाण तर अगदी मोजके आहे. हीच बाब ओळखून मानसिक आरोग्याच्या विषयावर परिवर्तन संस्थेमार्फत ‘मानसरंग नाट्यमहोत्सव’ भरवण्यात येतो. त्यापैकी 'ए बिस्मिल्ला' या नाटकात मुस्लीम स्त्रीची घालमेल, तिची होणारी घुसमट, कुटुंबातील आणि समाजातील तिची प्रतिमा या नाटकात दाखवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आघाडीची लेखिका आणि युवा पत्रकार हिनाकौसर खान यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. तर नाटकाचे दिग्दर्शन आणि सादरीकरण प्रसिद्ध अभिनेत्री रसिका आगाशे यांनी केले आहे. नुकताच या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातील द बॉक्स रंगमंचावर पार पडला. त्यावेळी आवाज मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधला.

या नाटकाच्या संकल्पानेविषयी बोलताना हिनाकौसर खान म्हणतात, “या नाटकातील पात्र आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आणि भोवतालचे आहे. आम्ही एका सर्वसामान्य मुस्लीम महिलेची व्यथा दाखवली असली तरीही नाटकाची कथा प्रत्येक स्त्रीच्या अवतीभोवती फिरते. ही कथा लिहिताना मनावर दडपण होतं परंतु, नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि त्याला मिळालेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद पाहून हे दडपण जरा कमी झालंय. मला जे म्हणायचंय ते लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतंय याचा मला आनंद आहे.” 

पुढे त्या म्हणाल्या, “यापूर्वी मी कधी नाटक लिहिले नाही. मला गोष्टी लिहायला आणि सांगायला आवडतात पण या नाटकाच्या निमित्ताने मला काहीतरी वेगळं लिहायची संधी मिळाली. मी या क्षेत्रात नवीन असल्याने नाटकाच्या लेखन प्रक्रियेत मला रसिकाची चांगली साथ मिळाली. नाटक लिहिण्याची माझी पहिलीच वेळ होती, त्यामुळे मला या नाटकाच्या माध्यमातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. हे नाटक सर्वांनीच पाहिलं पाहिजे असा आग्रह मी करेल.”

हे नाटक हिनाकौसर खान यांनीच लिहावे असे का वाटले, या प्रश्नावर दिग्दर्शिका रसिका आगाशे म्हणाल्या, “बिस्मिल्ला ही हीना आणि माझ्या मनातील म्हणजे आमचीच लेक आहे, जी आमच्या आसपास आहे. हिनासोबत बोलल्यावर मला जाणवले की हे नाटक हिनाच चांगल्या प्रकारे लिहू शकते. आत्ताच्या परिस्थितीत जे भोवताली सुरु आहे त्या सगळ्याचा परिणाम एका स्त्रीवर कसा होतो. विशेषतः ती स्त्री एका विशिष्ट धर्माची असेल तर तिच्यावर याचा वेगळा परिणाम कसा होतो हे या नाटकात दाखवण्यात आले आहे.” 

त्या पुढे म्हणाल्या, “कुठल्याही नाटकाचा पहिला प्रयोग असतो तेव्हा भीती वाटतेच तशीच भीती याही नाटकाच्या वेळी वाटली. आत्ता नाटक व्यवस्थितपणे पार पडल्यामुळे मला जरा हुश्श वाटतंय. हिनाला जे म्हणायचे आहे ते मी या भुमिकेद्वारे लोकांपर्यंत पोहोचवू शकले आहे. आम्ही कलाकार फक्त एक मध्यम आहे... लेखकाला जे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे ते पोहोचवण्याचे काम आम्ही करत असतो. हिना पुढे नाटक लिहील की नाही हा वेगळा मुद्दा आहे परंतु, तिने अशा पद्धतीचे लिहित राहावे. मला नाटककारापेक्षा एक अत्यंत जवळची मैत्रीण मिळाली आहे, आम्हाला एकमेकींच्या भावना कळतायेत. ”

‘ए बिस्मिल्ला नाटक’ लोकांनी का पाहावे, यावर रसिका म्हणाल्या… “आज आपल्याला आपल्या आई सोबत बसून संवाद साधायला वेळ नाही. बायका-बायका असून सुद्धा आपण एकमेकिंसोबत एवढा संवाद साधत नाही. म्हणून मला असं वाटतं की हे नाटक यासाठी उद्युक्त करणारं आहे. बोलतात सगळेच पण ऐकणारे किती लोक आहेत आणि आयुष्यात ऐकून घेणाऱ्यांचे महत्व किती आहे, हे आम्ही नाटकात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लहानमोठ्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन दाखवणार आहोत, ज्याठिकाणी मानसिक आरोग्यावर बोललेच जात नाही.”

 
- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter