अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या योजनांच्या 90% लाभार्थी महिला

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 4 d ago
अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू
अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू

 

राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ (NMDFC) यांच्या योजनेंतर्गत वित्तीय वर्ष २०२३ -२४ मध्ये १, ८४,८६५  लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने कर्ज वितरित करण्यात आले. यामध्ये महिला लाभार्थ्यांचे प्रमाण तब्बल ९०.५७  टक्के आहे. अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

NMDFC अंतर्गत विविध योजना:
NMDFC ही संस्था अल्पसंख्याक समाजातील गरजू व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करते. या योजनांतर्गत व्यवसाय, लघुउद्योग, शेती आणि विविध उपक्रमांसाठी आर्थिक मदत दिली जाते. याचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून त्यांचे अर्थसहाय्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे.

अल्पसंख्याक महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून NMDFC च्या विविध योजना अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी अल्पसंख्याक महिलांनी या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे.

केंद्र सरकारने अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. NMDFC च्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी अल्पसंख्याक नागरिकांना सहज आणि कमी व्याजदरावर कर्ज मिळते. त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.

NMDFC काय आहे? 
राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ  ही कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील एक सरकारी संस्था आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन या अल्पसंख्याक समुदायांमधील ‘मागासवर्गीय’ घटकांच्या फायद्यासाठी आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली.   

एनएमडीएफसीच्या योजना 

१. मुदत कर्ज योजना 
या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या सक्षम उत्पन्न निर्मिती उपक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठी कर्ज दिले जाते. क्रेडिट लाइन-१ अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत आणि क्रेडिट लाइन-२ अंतर्गत ३० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अनुक्रमे ६ टक्के  वार्षिक आणि ८ टक्के  वार्षिक व्याजदराने लाभार्थ्यांना दिले जाते. शिवाय, क्रेडिट लाइन-२ अंतर्गत महिला लाभार्थ्यांना २ टक्के  सवलत दिली जाते. 

२. शैक्षणिक कर्ज योजना  
या योजनेअंतर्गत पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या रोजगाराभिमुख 'तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी' कर्ज दिले जाते. क्रेडिट लाइन-१ आणि क्रेडिट लाइन-२ अंतर्गत देशांतर्गत अभ्यासक्रमांसाठी २० लाख रुपयांपर्यंत आणि परदेशातील अभ्यासक्रमांसाठी ३० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज लाभार्थ्यांना अनुक्रमे ३ टक्के वार्षिक आणि ८ टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाते. क्रेडिट लाइन-२ अंतर्गत महिला लाभार्थ्यांना ३ टक्के वार्षिक सवलत दिली जाते.  

३. सूक्ष्म-वित्त योजना 
या योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता गटांच्या सदस्यांना कर्ज दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने दुर्गम गावांमध्ये आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये विखुरलेल्या अल्पसंख्याक महिलांचा समावेश आहे. अनुक्रमे ७ टक्के  आणि १० टक्के  व्याजदराने स्वयंसहाय्यता गटाच्या प्रत्येक सदस्याला दिली जाते. क्रेडिट लाइन-२ अंतर्गत महिला लाभार्थ्यांना २ टक्के  सवलत दिली जाते. 

४. विरासत योजना 
ही योजना मुदत कर्ज योजनेचा एक भाग आहे. उपकरणे/साधने/यंत्रसामग्री/कच्चा माल खरेदी करण्यासाठी कार्यरत भांडवल आणि स्थिर भांडवलाची पूर्तता करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. क्रेडिट लाइन-१ आणि २ अंतर्गत जास्तीत जास्त १०.०० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. क्रेडिट लाइन-१ अंतर्गत ५ टक्के  वार्षिक साधे व्याज आणि क्रेडिट लाइन-२ अंतर्गत पुरुष कारागिरांकडून ६ टक्के वार्षिक व्याजदराने आकारले जाते. दोन्ही क्रेडिट लाइन अंतर्गत महिला कारागिरांना १ टक्के सवलत दिली जाते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter