निगार शाजी : भारताच्या सूर्यमोहिमेचे नेतृत्व करणारी मुस्लीम महिला वैज्ञानिक

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
इस्रोच्या मंचावरून बोलताना वैज्ञानिक निगार शाजी
इस्रोच्या मंचावरून बोलताना वैज्ञानिक निगार शाजी

 

'चांद्रयान-३'च्या यशानंतर इस्रोने भारताची पहिली सौर मोहीम म्हणजेच 'आदित्य एल-१' या सूर्याचा अभ्यास करणाऱ्या उपग्रहाचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. सलग दोन मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांचं जगभरातून कौतुक होत आहे. आदित्य एल १ सोबतच इस्त्रोच्या नारीशक्तीनेही गगन भरारी घेतली आहे. इस्रोच्या या यशामागे महिला वैज्ञानिकांचाही मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे सूर्य मोहिमेचं नेतृत्त्व एक मुस्लीम महिला वैज्ञानिक करत आहे. जाणून घेऊयात नेमकी कोण आहे ही मुस्लीम महिला.   

निगार शाजी. शेतकरी कुटुंबातून आलेल्या ५९ वर्षीय निगार इस्रोमध्ये आदित्य एल १ फ्लाइट सोलर मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम पाहतात. त्यांचे वडील आजही गावाकडे शेती करतात तर आई गृहिणी आहे. निगार या तामिळनाडूच्या शेंगोट्टई येथील रहिवासी आहेत. त्यांनी स्थानिक सरकारी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. निगार १०वी बोर्डात जिल्ह्यात प्रथम तर, १२वी बोर्डात महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. पुढे कामराज युनिव्हर्सिटी, मदुराई येथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीई (इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर) पदवी आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची येथून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. निगार यांचे पती दुबईत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करतात. मुलगा पीएचडीसोबत नेदरलँडमध्ये वैज्ञानिक म्हणून तर, मुलगी डॉक्टर म्हणून काम करते. इस्त्रोतील जबाबदारीच्या निमित्ताने निगार बंगळूरू येथे राहतात.  

शनिवारी सकाळी श्रीहरिकोटा येथून आदित्य-एल १ चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर निगार शाजी प्रसिद्धी झोतात आल्या. त्या गेल्या आठ वर्षांपासून प्रकल्प संचालक म्हणून हे मिशन सांभाळत आहेत. त्यांचे भाऊ एस. शेख सलीम म्हणाले, “निगार लहानपणापासूनच एक हुशार आणि होतकरु विद्यार्थिनी होती. संपूर्ण परिवाराला निगारच्या कामगिरीवर गर्व आहे. आदित्य-एल १ च्या प्रक्षेपणाच्या दिवशी आम्ही सगळे कुटुंबीय तणावात होतो. प्रक्षेपणाला घेऊन मनात धाकधूक होती कारण ही भारताची पहिलीच सौर मोहीम ठरणार होती. आणि आदित्य एल १ चे अखेर यशस्वी प्रक्षेपण झाले. या मोहिमेची प्रमुख या नात्याने निगारने केलेले भाषण टीव्हीवर दाखवण्यात आले. तिला बोलताना पहिले तेव्हा आमची छाती गर्वाने आणखीनच फुलली.” 

एका मुलाखतीत निगार म्हणाल्या होत्या की इस्त्रोच्या कोणत्याही शाखेत स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव केला जात नाही. इथे प्रत्येकजण आपल्या कामावरून ओळखला जातो. प्रत्येकाला आपले लक्ष्य गाठण्यासाठी समान संधी आणि प्रोत्साहन दिले जाते. 

अनेक महत्त्वाच्या पदांवर केलंय काम 
१९८७ मध्ये निगार यांनी सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्या यू. आर. राव सॅटेलाईट टीममध्ये सहभागी झाल्या. आदित्य एल १ मोहिमेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर असणाऱ्या शाजी या कम्युनिकेशन आणि आंतरग्रहीय उपग्रह मोहिमांच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी यापूर्वी भारताच्या रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट SAT-२A या मोहिमेच्या असोसिएट प्रोजेक्ट डिरेक्टर म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी इमेज कॉम्प्रेशन, सिस्टीम इंजिनीअरिंग आणि इतर अनेक विषयांवर शोधनिबंध लिहिले आहेत. निगार बंगळुरूमधील इस्रोच्या सॅटेलाइट टेलिमेट्री सेंटरच्या प्रमुखही होत्या.

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ चमकल्या
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अनेक मोहिमांमध्ये महिला शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा आहे. चांद्रयान-३ च्या यशात कल्पना कालाहस्ती यांचा समावेश होता. तर, निगार शाजी आता आदित्य एल १ च्या प्रकल्प संचालक म्हणून देशातील पहिल्या सौर मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वी, चांद्रयान-२ या मोहिमेत एम. वनिता यांनी प्रकल्प संचालक म्हणून तर, रितू करिधल यांनी मिशन डायरेक्टर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

केरळच्या अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांचंही आदित्य मोहिमेत मोलाचं योगदान आहे. त्या संगीतकार कुटुंबातून आहेत. त्यांनी 'आयआयए'मधून फिजिक्समध्ये पीएचडी केली असून त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या संचालिका आहेत. याच संस्थेने आदित्य एल-१ मधील मुख्य पेलोड VELC डिझाईन केलं आहे. चंद्रयान ३ च्या मोहिमेत कल्पना कालाहस्ती यांच्यासारख्या ५४ महिलांचे महत्वाचे योगदान आहे. 

निगार यांनी परियोजना टीमला मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ समितीचे आणि इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ आणि संचालकांचे त्यांच्या टीमवर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानले. त्या म्हणाल्या, “हि एक आव्हानात्मक मोहीम होती. केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी हि मोहीम महत्वाची होती. या मोहिमेचा संपूर्ण जगाला फायदा होणार आहे. अशा या महत्वपूर्ण मिशनचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या टीमसाठी, यशस्वी प्रक्षेपण करणे हे एक स्वप्न होते जे आज पूर्ण झाले.”

पृथ्वीच्या कक्षेत आदित्य
दरम्यान, शनिवारी प्रक्षेपण झाल्यानंतर सध्या आदित्य उपग्रह हा पृथ्वीच्या कक्षेत आहे. १८ सप्टेंबरपर्यंत तो पृथ्वीभोवती फेऱ्या मारेल. यानंतर तो एल १ या पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. सुमारे चार महिने प्रवास करुन एल १ या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित झाल्यानंतर आदित्य उपग्रह सूर्याचा अभ्यास करेल.