प्रज्ञा शिंदे
"२००९ चे वर्ष होतं. त्यादिवशी मला आठवतंय शाळेत पूजा होती, त्यामुळे मी खूप आनंदी होते. त्याला मी लहानपणापासून ओळखत होते. त्याचे काका आमच्या गावातच राहत होते. त्याने विचारलं कारमधून यायचं का? मोठ्या आनंदाने आम्ही हो म्हणालो. आणि त्या एका होकारानं माझं आयुष्यच बदललं. जाग आली तेव्हा आम्ही एका विचित्र जागी होतो. समोरचे काय बोलत होते काही कळत नव्हतं. फक्त एक गोष्ट समजली की आम्ही विकले गेलो आहोत. आता आम्हाला घरी जाता येणार नाही." अंगावर काटा आणणार हा प्रसंग आहे नसिमा गैन हिच्या आयुष्यातील.
वयाच्या १३ व्या वर्षी स्वतः मानवी तस्करीची शिकार झालेल्या नसीमा गैन यांनी आजवर ४०००हून अधिक महिलांची सुटका केली आहे आणि त्यांना त्या सामान्य आयुष्य जगण्यासाठी मदत करत आहेत.आजच्या या विशेष लेखातून जाणून घेवूयात नसीमाच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल..
[मानवी तस्करी बद्दल ..
मानवी तस्करी म्हणजे आर्थिक लाभाच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीला फसवणूक, धमकी, सक्ती, जबरदस्ती किंवा इतर गैरमार्गांचा वापर करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची किंवा तिथे अडकवून ठेवण्याची बेकायदेशीर प्रक्रिया. मानवी तस्करीचे बाल तस्करी (लहान मुलांना पळवून नेऊन त्यांना बालमजुरी, भीक मागण्यासाठी किंवा लैंगिक शोषणासाठी वापरणे),स्त्री तस्करी (महिलांना खोट्या आश्वासनाने किंवा जबरदस्तीने वेश्या व्यवसाय, जबरदस्तीच्या लग्नासाठी किंवा घरोघरी काम करण्यासाठी विकणे),कामगार तस्करी (पुरुष किंवा स्त्रियांना जबरदस्तीने किंवा फसवणूक करून कमी मोबदल्यात अत्यंत वाईट परिस्थितीत काम करायला भाग पाडणे),अवयव तस्करी (आर्थिक लाभासाठी बेकायदेशीर मार्गाने अवयव काढून घेणे आणि त्यांची विक्री करणे),गुन्हेगारी तस्करी (जबरदस्तीने किंवा धमकावून कोणाला चोरी, ड्रग्स वाहतूक, दहशतवादी कृत्ये करण्यासाठी वापरणे) असे प्रकार पडतात. ]
पश्चिम बंगालमधील मसलंदपूर येथे जन्मलेल्या नसीमा गैन यांचं बालपण आनंदात गेलं.मात्र तेरावं वर्ष नसीमासाठी मोठ कठीण ठरलं. ओळखीतील एका व्यक्तीने १३ वर्षांच्या नसीमाचं अपहरण करून त्यांना मानवी तस्करीच्या दलदलीत ढकललं. सुदैवाने, १० महिन्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र घरी परतल्यानंतर लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. पण नसीमा खचली नाही. आज तीच नसीमा मानवी तस्करीला बळी पडलेल्या शेकडो पीडित मुलींना त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी मदत करत आहे.उत्थान कलेक्टिव्ह आणि ILFAT (इंडियन लीडरशिप फोरम अगेन्स्ट ट्रॅफिकिंग) सारख्या तिच्या विविध उपक्रमांनी ४००० हून अधिक वाचलेल्या मुलींना त्यांचे जीवन पुन्हा सुरू करण्यास मदत केली आहे.
त्यादिवशी नेमकं काय घडलं…
घडलेल्या प्रसंगाबद्दल नसीमा सांगते, “ त्याने मला आणि माझ्या एका मैत्रिणीला विचारलं की आम्हाला कारमध्ये घरी जायचं आहे का? त्याच्या सोबत कारमध्ये अजून एक व्यक्ती होता. त्यांच्या हेतूंची कल्पना नसल्यानं आम्ही गाडीत बसलो. त्यांनी आम्हाला एका निर्जन ठिकाणी नेलं आणि तिथेच सोडून, काही वेळानं परत येईन असं सांगितलं. थोड्या वेळाने दुसऱ्या गाडीतून एक व्यक्ती आला, आणि तो आम्हाला घरी सोडतो असं म्हणाला. अंधार पडला होता, त्यामुळे आम्ही त्याचं म्हणणं मान्य केलं. पण त्याने आमचं आयुष्यच बदलून टाकलं.”
त्यांनी नसीमा आणि तिच्या मैत्रिणीला विकलं, आणि त्या बिहारला पोहोचल्या. तस्करी झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल नसीमा म्हणते “ त्यांनी आम्हाला नाचणं-गाणं शिकवलं. काही न ऐकल्यास मारहाण, मानसिक त्रास, आणि उपासमार सहन करावी लागायची. आम्ही घरी परतण्याच्या सगळ्या आशा गमावून बसलो होतो.”
कशी झाली सुटका?
हिंसा, छळ आणि उपासमार या गोष्टी नसीमा आणि तिच्या सारख्या इतर अनेक मुलींसाठी रोजच्याच झाल्या होत्या. या सगळ्या परिस्थितीत जेव्हा नसीमा आणि तिची मैत्रीण कामवाली बाई म्हणून विकल्या गेल्या, तेव्हा त्यांच्या सुटकेच्या आशा पुनः प्रज्वलित झाल्या. ज्या व्यक्तीकडे त्या कामवाली म्हणून काम करत होत्या, तो व्यक्ती प्राध्यापक असल्याचे नसीमा सांगते. नसीमा म्हणते, “ मला त्यांची भाषा हळूहळू समजू लागली होती. मग आम्ही कशा विकल्या गेलो आहोत आणि आता आमची सुटका करा, आम्हाला परत घरी जायचं आहे. हे सांगण्याच धाडस केलं.” ती पुढे म्हणते, “ मला माहीत होत हे जर आमच्या मालकाला कळलं तर पुन्हा छळ आहेच; पण नाही समजलं तर सुटका होईल. त्यामुळे आम्ही त्यांना सांगण्याचा निर्णय घेतला.”
सर्व हकीकत ऐकून घेतल्यानंतर प्राध्यापकांनी त्यांना त्यांच्या घरच्यांचा नंबर विचारला. नसीमाच्या मैत्रिणीला घरचा नंबर लक्षात होता. प्रोफेसरने त्यांना कॉल केला. नसीमाच्या मैत्रिणीच्या पालकांनी नसीमाच्या पालकांना आणि पंचायतीला कळवले . त्यात बिहार पोलिसांचाही सहभाग होता.
पोलिस आणि पालक नसीमा आणि मुलींपर्यंत पोहोचू शकायच्या आतच तस्करी करणाऱ्या व्यक्तीला प्राध्यापकांनी मुलींच्या पालकांना माहिती पुरवल्याचं समजल. मग नसीमा आणि तिच्या मैत्रिणीला वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आल. अनेक आठवडे त्यांचा माग काढल्यानंतर, १० महिन्यांनी नसिमा आणि तिच्या मैत्रिणीची अखेर सुटका करण्यात आली. नसीमा म्हणते, “आमची सुटका करून घरी घेऊन जाणं अजूनही अवास्तव वाटत आहे. मी सर्व आशा गमावल्या होत्या, मात्र आमच्या आणि पोलिसांच्या प्रयत्नाना यश आल. मी त्या प्राध्यापकांची ही खूप आभारी आहे.”
सुटकेनंतर कशी होती लोकांची वागणूक
१० महिन्यांनंतर, वारंवार विकल्या गेल्यानंतर,अखेर नसीमा आणि तिच्या मैत्रिणीची सुटका झाली. घरी परतल्यावर, घरच्यांना मुलगी परतल्याचा आनंद झाला, पण गावकऱ्यांनी त्यांना स्वीकारलं नाही.यावर नसीमा म्हणते “ हे आपल्या समाजाचे दुःखद वास्तव आहे. मी परिस्थितीची बळी होते, परंतु तरीसुद्धा मला बहिष्कृत केलं गेलं." पुढे ती म्हणते, "मुलांचे आई-वडील आपल्या मुलांना आमच्याशी बोलू नका, नाहीतर कोणीतरी तुमचीही अशीच तस्करी करेल असं सांगयचे."
नसीमा सांगते, "आम्हाला शाळेत जाण्याची परवानगी नव्हती, कारण त्यांनी आम्हाला परत घेण्यास नकार दिला. दहा महिन्यांचा छळ आणि नंतर समाजाची ही अशी वागणूक यामुळे मी स्वतःच स्वतःपासून दूर होत गेले. मी पुढील पाच वर्ष माझं घर सोडलं नाही,” या प्रसंगाच्या अनुभवाने नसीमाच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण केली होती. ती म्हणते, “मानवी तस्करीच्या दलदलीतून बाहेर पडूनही समाजाच्या बहिष्कृत वागणुकीमुळे मी दु:खी होत गेले.”
नसिमाच्या पालकांना तिची सामाजिक अनिच्छा लक्षातआली, तिची घालमेल आणि अस्वस्थता लक्षात घेवून त्यांनी नसीमाला एका एनजीओकडे नेलं. मानवी तस्करीतून वाचलेल्यांचे समुपदेशन त्या एनजीओ मार्फत केलं जात होतं. त्या समुपदेशनाने नसीमाला बरंच बळ मिळल्याच नसीमा सांगते.
लढवय्यी नसीमा
स्वतः एनजीओकडून समुपदेशन घेतल्यानंतर आपण ही सुटका झालेल्या, या अमानवी दलदलीतून वाचलेल्या लोकांच समुपदेशन करू शकतो, असा आत्मविश्वास नसीमाला निर्माण झाला. तिथून पुढे तीने अशा मुलींशी - महिलांशी संपर्क साधून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न चालू केला.
नसीमा म्हणते “माझ्याकडे जे काही आहे, त्याला धैर्य म्हणा, आशा म्हणा किंवा भाग्य म्हणा - स्वतःला सावरून मी आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच माझ्यात इतरांना मदत करण्याची हिम्मत निर्माण झाली आहे. मी आणखी काही माझ्यासारख्या मुलींची मदत कारण्यांसाठी ‘उत्थान कलेक्टिव्ह’ सोबत २०१६ मध्ये काम सुरू केलं, ही संस्था पीडित आणि वाचलेल्या मुलींना प्रशिक्षण, समुपदेशन आणि मदत पुरवते.”
भारतात अशा पीडिता मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांना सुटकेननंतरही गुन्हेगाराची वागणूक मिळते. नसीमाला अशाच सर्व पीडितांसाठी नवी ओळख आणि नवे विश्व निर्माण कारायचे आहे.
२०१९ मध्ये, नसिमाने देशभरातील अशाच मानवी तस्करी विरोधात काम करणाऱ्या समूहांसोबत इंडियन लीडरशिप फोरम अगेन्स्ट ट्रॅफिकिंग(ILFAT) ची स्थापना केली आहे. या संस्थेचे काम नऊ राज्यांमध्ये पसरलेले आहे. ४५०० हून अधिक पीडितांना त्यांनी जगण्याची नवी दिशा दिली आहे.
इंडियन लीडरशिप फोरम अगेन्स्ट ट्रॅफिकिंग
नसीमाने स्थापण केलेली ही संस्था पीडितांना त्यांच्या विविध कौशल्यावर आधारित कामांचे प्रशिक्षण देते आणि उपजीविकेसाठी मदत करते. संस्थेबद्दल माहिती सांगताना नसीमा म्हणते, “आम्ही पीडितांशी संपर्क साधतो आणि त्यांना मानसिक आरोग्य विषयक सहाय्य आणि समुपदेशन देतो. आउटरीच कार्यक्रमांद्वारे त्यांचे आघात आणि दुःख एकमेकांना एकमेकांशी जोडतात. त्यामुळे त्यांना तिथे कुठलाच न्यूनगंड येत नाही. याद्वारे त्यांना पुढे जाण्यास मदत होते.”
ती पुढे म्हणते, “अशा परिस्थितीतून आलेल्या व्यक्तीला अत्यंत काळजी, प्रेम आणि आदराची गरज असते. तस्करी होण्याच्या प्रक्रियेत त्यांनी त्यांचा सर्व स्वाभिमान गमावलेला असतो. समाज त्यांना नाकारतो आणि अनेकांना तर त्यांच्या कुटुंबीयांनीही नाकारले असते. आम्ही त्यांना आवश्यक आधार आणि निवारा देतो.”
तिच्या या कामाबद्दल विचारले असता, नसिमा म्हणते, “अनेक वेळा वेगवेगळ्या NGO माझ्यापर्यंत पोहोचतात आणि ILFAT आणि उत्थान कसे कार्य करतात ते शिकतात. ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आणि विजय आहे.” पुढे ती म्हणते, “ संस्थेसोबत मला पीडितांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करायचे आहे, गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळेल याची खात्री आणि सर्व वाचलेल्या मुलींचे पुनर्वसन करायचे आहे.”
नसिमा तिच्या सहकाऱ्यांसोबत मानवी तस्करीच्या दलदलीतून सुखरूप बाहेर पडलेल्या मुलींना मानसिक आरोग्य सुधारवण्यासाठी मदत पुरवते , त्यांना नुकसान भरपाई देते, त्या मुलींना त्यांच्या कौशल्याची ओळख करून देते आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांना वाढवते.
नसीमाच्या या सगळ्या कामामुळे प्रत्येकजण आता नसीमाकडे मोठ्या आदराने पाहतो. २६ वर्षीय नसीमा जेव्हा या मानवी तस्करीतून सुटते, तेव्हा ती म्हणते " लोखंडाला जेवढे तापवाल तेवढं ते अधिक मजबूत होत." बऱ्याच आव्हानांचा सामना केल्यावर, नसिमाचा असा विश्वास आहे की त्या सर्व कठीण काळाने तिला मजबूत केलं आहे. एक साधीभोळी किशोरवयीन मुलगी आता एक लढवय्यी स्त्री झाली आहे. गाडीतून प्रवासाच्या त्या एका आमिषाने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होत. मात्र आता तिने देशातून मानवी तस्करी उखडून टाकण्याचा निर्धार केला आहे.
नसीमाच्या या लढवय्या वृत्तीला आवाज मराठीचा सलाम !