मुस्लीम महिलांनी सक्षमपणे वापरला 'चॅलेंजिंग वोट'चा अधिकार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

राज्यातील विधानसभेच्या निवडणूका शांततेत पार पडल्या. राज्यात एकूण ६५. ११ % मतदान नोंदवण्यात आले. महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी मुस्लिम समाजामध्ये उत्साह पहायला मिळाला. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग होता. यावेळी काही महिलांनी सुमन नाईक शाळेतील केंद्रावर चॅलेंजिंग मतदान केले. 

कथडा येथील सुमन नाईक शाळा मतदान केंद्रात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा आरोप मतदारांनी केला. यामुळे काही मतदार मतदान न करता परतले; तर काहींनी आपल्या हक्कासाठी लढा दिल्याने त्यांचे शेवटी 'चॅलेंजिंग' मतदान करण्यात आले. 

मध्य विधानसभा मतदारसंघातील जुने नाशिक परिसरातील विविध मतदान केंद्रांमध्ये मतदार यादीतील चुकीमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले; तर काही केंद्रात बोगस मतदान झाल्याचा आरोप मतदारांनी केला. बूथ प्रमुखांनी त्यांना मतदान नाकारल्याने अनेक मतदारांना मतदान न करतापरतावे लागले. सुमारे १५ ते २० मतदार होते. यातील काही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय जाणार नाही. अशी भूमिका घेतल्याने तब्बल चार तासांनंतर त्यांचे 'चॅलेंजिंग' मतदान करून घेण्यात आले. 

आपण मतदान न करता आपले मतदान झाले कसे, असे प्रश्न मतदारांनी व्यक्त केले. त्यांची मतदान हक्क बजावण्याची धडपड आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस व बूथप्रमुखांशी चर्चा करीत मतदान यंत्रणेने दिलेला अधिकार 'चॅलेंजिंग' मतदानाच्या माध्यमातून अखेर चार तासांच्या प्रतीक्षेनंतर मतदारांकडून केंद्रावरील अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदान करून घेतले. मात्र, या प्रकारानंतर मतदारांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

मतदान न करता आल्यामुळे नाराज झालेल्या आणि चॅलेंजिंग वोट या अधिकाराविषयी अनभिज्ञ असलेल्या शबाना शेख म्हणाल्या, “मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मी गेले होते. त्यावेळी माझे मतदान झाले आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आणि मतदान करू न देता माघारी पाठवून दिले. मतदान केंद्रावरती उशिरापर्यंत थांबून त्यांना विनंती करूनही त्यांनी मतदान करू दिले नाही. मला मतदान करायचे होते. माझी इच्छा नसताना मला माघारी परतावे लागले.” निवडणूक आयोगाने दिलेला 'चॅलेंजिंग' मतदानाचा अधिकार माहीत नसल्याने शबाना यांना मतदान करता आले नाही.  

तर रईसा शेख म्हणाल्या, “मी सकाळी ११ पासून मतदानासाठी रांगेत उभी होते. माझा नंबर येताच तुमचे मतदान झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मी मतदान केलेच नाही तर झाले कसे, असा प्रश्न मी केला. मला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली. यामुळे पुन्हा तीन वाजता मतपत्रिकेवर मतदान करून घेतले.”

अजीम शेख चॅलेंजिंग मतदानाविषयी बोलताना म्हणतात, “मी मतदान करण्यासाठी गेले. माझ्या नावाने दुसऱ्याने मत केल्याचे बूथ कर्मचाऱ्यांनी सांगितले. मला मतदान करण्यास नकार दिला. मतदान केल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका मी घेतली. यानंतर मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर दुपारी उशिरा मतपत्रिकेवर मतदान करून घेतले. ” 

चॅलेंजिंग मतदान काय आहे?
मतदान केंद्रातील अधिकऱ्यांनी जर सांगितले की तुमचे मतदान झाले आहे. तर मतदाराला लगेच तुम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते. निवडणूक आयोगाने दिलेला 49P कायद्यानुसार मतदाराला निविदा मतदान करण्याचा अधिकार आहे. यासाठी  निविदा अर्ज देण्यात येतो. त्या अर्जावर उमेदवाराला त्याची सही करायची असते.  या प्रक्रियेला चॅलेंजिंग मतदान म्हटले जाते. 

याशिवाय मतदारांच्या नावात किरकोळ बदल असणे, फोटो फिक्का किंवा काळवंडलेला असणे आदी कारणास्तव मतदान करता आले नाही तर मतदाराला चॅलेंजिग व्होटिंगचा पर्याय आहे. मतदारांसाठी तसा अर्ज प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असतो. या अर्जाच्या मध्यमातून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येतो.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter